मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (11:53 IST)

प्रत्येक गावात हिवरे बाजार पॅटर्न राबवा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव संपवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची गती वाढवली आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर काळजी घेतली जात असून प्रत्येक गावात आता हिवरे पॅटर्न राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
 
यावेळी आदर्श गाव हिवरे बाजारने कोरोना मुक्तीसाठी गावामध्ये केलेल्या उपाययोजना, रुग्णांचे विलगीकरण याची माहिती पवार यांनी सर्व सरपंच आणि ग्रामसस्तरीय अधिकारी यांना दिली होती. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हाच हिवरे बाजार पॅटर्न जिल्ह्यातील सर्व गावात राबवण्याचे ठरविले असून तशा सूचना आज त्यांनी सर्व तहसीलदार आणि तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या,माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या संकल्पनेवर आधारित माझे गाव माझी जबाबदारी आणि माझी सुरक्षितता माझी जबाबदारी या संकल्पना गावपातळीवर राबवाव्यात.कोविड प्रसार रोखण्यासाठी गावातील शंभर टक्के कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यासाठी गावातील स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि गावातील तरुण स्वयंसेवकाचा गट याची मदत घ्यावी. कोरोना प्रतिबंधक व उपचारासाठी गावात तरुण स्वयंसेवकांची पथके तयार करुन त्याद्वारे सर्वेक्षणापासून कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही करावी.
 
लक्षणे दिसू लागताच तपासणीची वाट न पाहता तात्काळ अशा व्यक्तीस विलगीकरण कऱण्यात यावे आणि तपासणीअंती अशी व्यक्ती बाधित आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात अथवा रुग्णालयात दाखल करण्यात यावे. गावात एखाद्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्यास तात्काळ हेल्पलाईन १०८ 
क्रमांकावर संपर्क करुन रुग्णवाहिका उपलब्ध करुन घ्यावी. गावातील दूधसंकलन केंद्रे, किराणा, धान्य दुकान, विविध कार्यकारी सेवा सोसायटी अशा गावातील गर्दी होणाऱ्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होईल, याच्या उपाययोजना कराव्यात.
 
एखाद्या कुटुंबातील सदस्य बाधित आढळल्याने त्याच्या कुटुंबाच्या आवश्यक दैनंदिन कामांत स्वयंसेवकांची मदत घ्यावी. गावातील गरजू नागरिकांना ग्रामनिधीतून सुरक्षित मास्कचे वाटप करावे, गावातील पदाधिकाऱ्यांनी कोरोना बाधित रुग्णांची दूरध्वनीद्वारे संवाद साधण्यास प्रोत्साहन द्यावे.
 
त्याने रुग्णांना मानसिक आधार मिळेल. गावातील एखादी व्यक्ती बाधित आ़ढळल्यास तशी माहिती ग्रामसुरक्षा प्रणालीवर देण्यात यावी. लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणण्यासाठीचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.