मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अमरावती , शनिवार, 22 मे 2021 (11:43 IST)

संस्थात्मक प्रसूती पापळ पीएचसी पहिली

ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या रूग्णालयांतील संस्थात्मक प्रसूतीत पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. गत वर्षापासून 255 संस्थात्मक प्रसूती पापळ पीएचसीमध्ये सुखरूपपणे पार पडल्या असून, कोविड काळात येथील संस्थात्मक प्रसूतीचा दर वाढला आहे.
 
माता व बालमृत्यूदर कमी होण्यासाठी संस्थात्मक प्रसूती होणे गरजेचे असते. आरोग्यविषयक निर्देशांकातही संस्थात्मक प्रसूती या घटकाची गणना होते. जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या प्रा. आ. केंद्रे, उपकेंद्रे व कार्यक्षेत्रातील खासगी संस्था मिळून पाच हजार 666 संस्थात्मक प्रसूती झाल्या. त्यातील 2 हजार 885 प्रसूती 
प्रा. आ. केंद्रात झाल्या. जिल्ह्यात एकूण 59 पीएचसी असून, पापळ येथील प्रा. आ. केंद्रात अडीचशेहून अधिक प्रसूती सुखरूपपणे पार पडल्या. पापळ केंद्राला यापूर्वी दोनवेळा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. या यशात तेथील आरोग्य सहायिका निर्मला लकडे यांचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांचे सगळे सहकारी व वरिष्ठ सांगतात. श्रीमती लकडे या 24 वर्षांपासून आरोग्यसेविका व नंतर सहायिका अशा पदावर कार्यरत असून, त्यांनाही फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार यापूर्वी प्राप्त आहे.
 
*कठीण शस्त्रक्रिया पार पाडतात*
 
पापळ केंद्रात 34 गावे जोडली आहेत. तिथे अनेकदा वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातूनही केसेस येतात. कोविडकाळात संपूर्ण सुरक्षितता व दक्षता पाळून शस्त्रक्रिया केल्या जातात. श्रीमती लकडे यांनी परिश्रमातून  प्रसूती व संगोपनशास्त्रात कौशल्य मिळवले, तसेच त्या 24 वर्षांपासून निष्ठापूर्वक सेवा देत आहेत. त्यांनी अनेक
क्रिटीकल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे केंद्राचा लौकिक वाढला, असे त्यांचे सहकारी सांगतात. गतवर्षी समृद्धी महामार्गावर काम करणा-या एका परप्रांतीय मजूराच्या पत्नीची प्रसूतीसमयी प्रकृती गंभीर झाली होती. बाळ गुदमरले होते. या मजूराला मराठी येत नसल्याने संवादाची ही काहीशी अडचण होती. त्यावेळी त्याच्या पत्नीची प्रकृती तपासून नेमकी समस्या काय आहे, हे श्रीमती लकडे यांच्या लक्षात आले व अजिबात वेळ न दवडता त्यांनी तातडीने हालचाली करून निष्णातपणे सुखरूप शस्त्रक्रिया पार पाडली. अशा अनेक कठीण शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्याचे सहकारी सांगतात.
 
*येथील टीमवर्क उत्तम असते*
 
वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक डाखोरे, आरोग्यसेविका सुमित्रा शेलोकार, श्रीमती आर. बी. गायकवाड, सुधीर बाळापुरे यांच्यासह सर्व स्टाफकडून उत्तमरीत्या टीमवर्क केले जाते. संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी परिचरपासून अधिका-यांनी सर्वांनी परिश्रम घेतले असल्याचे श्रीमती लकडे म्हणाल्या.
 
कोविडकाळातही प्रत्येक अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यात खंड पडू न देता निरंतर काम करत आहे. पापळ येथील सर्व सहका-यांचे अभिनंदन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जी. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.