शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (09:01 IST)

मुळशीतील सार्वजनिक रुग्णालयांना ‘टाटा पॉवर’चा मदतीचा हात

मुळशीतील सार्वजनिक रुग्णालयांना ‘टाटा पॉवर’ने मदतीचा हात दिला आहे. ‘टाटा पॉवर’च्या वतीने मुळशी येथील रुग्णालयांना 40 पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलिंडर्स दान केले आहेत. प्रत्येकी 47 लिटर (सात क्युबिक) वजनाचे हे ऑक्सिजन सिलिंडर्स रुग्णालयांना सध्या भासत असलेली ऑक्सिजनची निकड पूर्ण करण्यात मोलाचे ठरणार आहेत.
 
टाटा पॉवरच्या हायड्रो डिव्हिजनच्या टीमने उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी पुण्यात विधान भवन येथे हे सिलिंडर्स सुपूर्द केले.
 
टाटा पॉवरच्या हायड्रो डिव्हिजनचे प्रमुख प्रभाकर काळे म्हणाले, ‘कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घालायला सुरुवात केल्यापासून आम्ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मदत करण्यासाठी ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट’मार्फत सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अत्यावश्यक साधनसामग्रीचा तुटवडा भरून काढण्यासाठीचे आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करण्याचे आमचे प्रयत्न पुढे देखील असेच सुरु राहतील.
 
‘टाटा पॉवर’ स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाची मदत करत आहे. तपासण्या, लसीकरण, लोकांचा दृष्टीकोन आणि जनजागृती, रुग्णालयांमध्ये बेड्स, औषधे व ऑक्सिजनची उपलब्धता यांच्याशी संबंधित अनेक आव्हाने उभी राहत आहेत. त्यामुळे चांगल्या दर्जाचे फिल्टर-बेस्ड मास्क्स बनवून वितरित करणे, स्थानिक संस्थांना कोविडपासून संरक्षण देणारे किट्स आणि घरी आयजोलेशन काळात सहायक ठरणारे किट्स दान करणे आणि कोविडविरोधात काळजी घेण्यासाठी टेली हेल्पलाईन्स सक्षम करणे, असे उपक्रम राबविले जात असल्याचे काळे यांनी सांगितले.