शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (09:38 IST)

नवरा-बायको, सख्खे भाऊ आणि बाप-लेक, पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू

In Ahmednagar district
अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी  पाण्यात बुडून तीन वेगवेगळ्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात पती-पत्नी, बाप-लेक आणि सख्ख्या भावांचा यामध्ये समावेश आहे.
 
एकाच दिवशी पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या सहापैकी दोघा जणांचे मृतदेह सापडले आहेत. चौघांचा शोध सुरु आहे. 
 
कुठे काय घडलं
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे मासेमारी ‌करणाऱ्या दाम्पत्याचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूरजवळील गांजावाडी येथील नाल्यात बुडून बाप-लेकाचा जीव गेला. तर राहुरीजवळील गणपती घाट येथे मुळा नदी पात्रात बुडाल्यामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.
 
एका दिवसापूर्वीच नाशिक जिल्ह्यात वेगवेगळय़ा ठिकाणी पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. बीड तालुक्यातील समर्थ छानवाळ (१४) हा येवला तालुक्यातील वडगाव गावातील नदीपात्रात कुटुंबासह कपडे धुण्यासाठी गेला होता तेव्हा पाण्यात खेळत असताना बुडाला. 
 
दुसऱ्या घटनेत सुनील कोर (३७) हा अंबासन गावातील युवक मोसम नदीत गेला असता त्याला अचानक फीट आली. तो मोसम नदीच्या पात्रातील खड्डय़ात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.