सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (14:51 IST)

चाळीसगावात कीर्तनकाराचे घर फोडले, अडीच लाखांचा ऐवज लंपास

घर बंद करून कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी धुळे येथे गेलेल्या कीर्तनकाराच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या ४० हजार रूपयांच्या रोकडसह कॉटमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने असा जवळपास २ लाख ३४ हजारांचा ऐवज चाेरट्यांनी लंपास केल्याची घटना चाळीसगाव शहरातील भडगाव रेाडवरील गजबजलेल्या जय शंकर नगरमध्ये घडली. या प्रकरणी कीर्तनकार रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, शहरातील भडगाव रोडवरील जय शंकर नगरमध्ये रवींद्र वसंतराव पाटील (वय ४५) हे कीर्तनकार राहतात. धुळे येथील तीन दिवसांच्या कीर्तन कार्यक्रमासाठी रवींद्र पाटील हे पत्नी व दोन्ही मुलींसह ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता घर बंद करून गेले हाेते. कीर्तनाचा कार्यक्रम संपवून रवींद्र पाटील हे कुटुंबासह १४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या घरी परतले असता घराच्या मुख्य लोखंडी दरवाजाचा कोयंडा त्यांना तुटलेल्या अवस्थेत दिसला तर घराला कुलूप ही नव्हते. घरात जावून पाहिले असता कॉटवरील गादी, कपडे, चादरी अस्ताव्यस्त पडलेल्या हाेत्या तर गोदरेज उघडलेले व त्यातील साहित्य ही अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
 
कॉटमध्ये ठेवलेले दागिने केले लंपास
चोरट्यांनी घरापुढील लोखंडी दरवाजाला लावलेले कुलूप तोडून लाकडी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर गोदरेज कपाटात ठेवलेली ४० हजारांची राेख रक्कम व बेडरूममधील कॉटमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चाेरुन नेले. यात ८४ हजार रूपये किमतीची २१ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, २८ हजारांचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, २० हजारांचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे काप, २० हजारांची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ८ हजाराची २ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, २० हजारांचे ५ ग्रॅम साेन्याचे कानातले दागिने, ४ हजारांचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीन तुकडे व १० हजारांचे २२ भार चांदीचे दागिने असा जवळपास २ लाख ३४ हजारांचा ऐवज चोरल्याचे समोर आले आहे. वर्दळीच्या व गजबजलेल्या भागात चोरीच्या घटनेने भडगाव रोडवरील जय शंकर नगर भागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कीर्तनकार रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस करत आहेत.