मुसळधार पावसात बंधारे धरणे फुटली ;संपुर्ण चाळीसगाव शहर जलमय ;रथ गल्ली भागापर्यंत आले पाणीच पाणी
चाळीसगाव / जळगाव / औरंगाबाद : जून-जुलै महिन्यात राज्यात अनेक भागात पाऊस झाला तसेच ऑगस्टमध्ये ही काही भागांमध्ये तुरळक स्वरूपात पर्जन्यवृष्टी झाली. परंतु जळगाव जिल्ह्याचा काही भाग कोरडाच होता. त्यामुळे सहाजिकच बळीराजाचे आभाळाकडे डोळे लागले होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोमवारी रात्रीपासूनच आता पुन्हा एकदा राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर या भागासह लगतच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड सोयगाव, सिल्लोड तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. चाळीसगाव – कन्नड घाटामध्ये तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण चाळीसगाव शहर जलमय झाले आहे. तसेच लगतच्या नागद गावाजवळील तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे
राज्याच्या अनेक भागात काल दि.३० ऑगस्टच्या रात्रीपासून संततधार ते जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणातील सर्व भागात तसेच मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद सह संपूर्ण मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात तसेच खानदेशातील जळगावमधील काही तालुक्यात जोरदार पावसाने नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे अनेक घरे दुकाने पाण्याखाली गेली आहेत.
खांदेशातील चाळीसगाव आणि मराठवाडयतील कन्नड तालुक्याच्या सीमारेषेवरील ढगफुटी झाली. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला. तर कन्नड चाळीसगाव घाटात कोसळली दरड कोसळून दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प झाली, घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार उडाला असून ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला महापूर आला आहे. कन्नड तालुक्यातील सुमारे १५ गावांचा संपर्क तुटला असून नागरी भागातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयगाव तालुक्यातील हिवरा नदीला महापूर आला असून कन्नड तालुक्यातील गडद नदीला देखील पूर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे, सुमारे वीस ते पंचवीस वर्षात असा पाऊस आणि महापूर झाला नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
चाळीसगाव आणि कन्नड या सीमारेषेवरील घाट परिसरातील तीतूर डोंगरी नदीच्या उगमस्थानावरील कोदगाव आणि वलथाण आदि धरणे भरली असून जोरदार पावसामुळे नदीला महापूर आला आहे. त्यामुळे चाळीसगाव शहरातील गल्ली भागात तसेच मुख्य बाजारपेठेत पाणी पाणी दिसत आहे. शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही पुलावरुन मोठया प्रमाणावर पाणी वाहत असल्याने चाळीसगाव शहरातून औरंगाबादकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.
धुळे – सोलापूर हा चाळीसगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जलमय झाल्यामुळे कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून, अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत. चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी नांदगाव, वैजापूर किंवा अजिंठा सह अन्य मार्गाने प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कारण औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली. दरड कोसळून अनेक वाहने रस्त्यावरील चिखलात अडकल्या आहेत. रात्रीपासूनच रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात जिल्हा प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.
खानदेश आणि मराठवाडा यांच्या सीमारेषेवर असलेल्या सोयगाव कन्नड आणि चाळीसगाव भागातील भिलदारी पाझर तलाव फुटल्याने नागद परिसरात प्रचंड पूर आला. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब तोडून स्थानिक नागरिकांनी काढले बाहेर. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनीच्या हा प्रकार लक्षात आल्यावर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले.