शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (12:48 IST)

औरंगाबादचा कन्नड घाट दरड कोसळून ठप्प, भिलदरी पाझर तलाव फुटला

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. त्यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अनेक गाड्यांवर दरड कोसळल्याने नुकसान झालं आहे. तसंच महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून अनेक गाड्या रात्रीपासून अडकल्या आहेत.

सध्या धुळे-औरंगाबाद-सोलापूर महामार्ग ठप्प आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचं आणि गाड्या काढण्याचं काम सुरू आहे. परंतु सततच्या पावसामुळे कामात अडथळा येत आहेत. तसंच रस्त्यावर सगळीकडे चिखल झाल्याने गाड्या अडकल्या आहेत.

सोमवारपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडतोय. कन्नड घाटातही रात्रभर पाऊस कोसळत होता.
 
धुळे-औरंगाबाद महामार्ग बंद असल्याने पोलिसांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा असं आवाहन केलं आहे. औरंगाबाला जाण्यसाठी चाळीसगावमार्गे प्रवास करावा तर पुण्याहून औरंगाबादला जायचे असल्यास जळगाव मार्गाने जावं, संही आवाहन करण्यात आलं आहे.
 
मुसळधार पावसामुळे भिलदरी पाझर तलाव फुटला असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. नागद गावातील परिस्थिती भीषण असल्याची माहिती समोर येत आहे.