इंडियाकडे अनेक पर्याय….भाजपकडे मोदी सोडून आहेत काय ? उद्धव ठाकरेंचा सवाल
इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक पर्याय आहेत, भाजपकडे नरेंद्र मोदी सोडून दुसरा कोण आहे का ? असा मिष्किल सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. देशातील हुकुमशाही आणि तानाशाही विरुद्ध भारतमातेचं संरक्षण करण्यासाठी आम्ही देशभरातून एकत्र आलो असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.
31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई येथे होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देशात हुकुमशाही वाढली आहे. या हुकुमशाहीमध्ये भारतमातेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.” असेही ते म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक पर्याय आहेत पण भाजपकडे मोदींशिवाय दुसरा पर्याय आहे काय..? मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आम्ही हाणून पाडलाय. कोणालाही मुंबई वेगळी करता येणार नाही.” असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या युतीबाबत बोलताना ते म्हणाले, “प्रकाश आंबेडकर आणि आमची युती आहे हे याहीपुर्वी आम्ही जाहीर केले आहे. महाविकास आघाडीत येण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यावर आघाडीमध्ये चर्चा नक्की केली जाईल.”असेही ते म्हणाले.