मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (09:22 IST)

असा आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ऑनलाईन गणेशोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षानिमित्त गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक २२  ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा संपन्न होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
 
ऑनलाईन कार्यक्रम 
 
ॠषीपंचमीनिमित्त रविवार, दिनांक २३ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता प्रातिनिधीक स्वरुपात महिला अथर्वशिर्ष पठण आणि श्री गणेशाची महाआरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनामुळे घरी राहून साधेपणाने आपण गणेशोत्सव साजरा करीत आहोत. यंदा सार्वजनिक प्रकारे कार्यक्रम करता येत नसला तरी ही अथर्वशिर्ष पठणाची परंपरा खंडित होणार नाही. ट्रस्टच्या @dagdushethganpati या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह होणार आहे. घरबसल्या यामध्ये सहभागी होण्यासाठी व रजिस्टर करण्यासाठी http://dagdushethganpati.com/marathi/rishipanchami-registration-marathi-2020/ या लिंकवर क्लिक करावे. 
 
ऑनलाईन पद्धतीने अनेक धार्मिक, सांस्कृ तिक कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट पर्यंत दररोज दुपारी ४  वाजता ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवरुन निरुपणकार गाणपत्य स्वानंद पुंड शास्त्री, वणी, यवतमाळ हे अथर्वशिर्षावर निरुपण करीत आहेत. तसेच स्वरपूजा या ऑनलाईन कार्यक्रमातून दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत दररोज विविध कलाकारांनी यापूर्वी श्रीं ची चरणी अर्पण केलेली गायनसेवा गणेशभक्तांना घरी बसून अनुभविता येणार आहे.
 
श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४  तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.