केंद्राकडून लसीचा अपुरा पुरवठा; आशिष शेलारांनी त्यात लक्ष घालावं-जयंत पाटील
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी केंद्र सरकारने जबाबदारी घ्यायला हवी.केंद्राकडून लसी कमी येत आहेत. सांगलीमध्ये लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे.त्यामुळे आशिष शेलार यांनी लसपुरवठ्यामध्ये लक्ष घालावं. त्यांनी केंद्राकडून लस उपलब्ध करून द्यावी,असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना लगावला. सांगली दौऱ्यावर असताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी करून टाकलं आहे, असा घणाघाती हल्ला केला होता. त्यानंतर याच टीकेला प्रत्यूत्तर म्हणून जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
विरोधक त्यांचं काम करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे.लसीचा पुरवठा कमी होत आहे. याबाबत केंद्र सरकारने जबाबदारी घ्यायला हवी. सांगलीमध्ये लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि केंद्राकडून लस उपलब्ध करून द्यावी, असे जयंत पाटील म्हणाले.
शेलारांची ठाकरे सरकारवर टीका
यापूर्वी आघाडी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी करून टाकलं आहे. दुर्दैवाने येथे मृत्यूचा दर जास्त आहे. कोरोना रुग्णांना सुविधा देण्यात सरकार कमी पडत आहे. या सरकारकडून सकारात्मक प्रयत्न दिसला नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. तसेच पुढे बोलताना त्यांनी ठाकरे सरकारची वृत्ती ही रक्तपिपासू असल्याचा आरोप केला. लस आल्यावर देशात महाराष्ट्र एक नंबरवर आला ते ठाकरे सरकारमुळे आणि काही चुकले तर मोदी सरकार जबाबदार,अशी राज्य सरकारची दुटप्पी भूमिका आहे. ठाकरे सरकारची वृत्ती रक्तपिसासू अशी आहे, असे आशिष शेलार म्हणाले होते.