सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 20 मार्च 2022 (10:22 IST)

महाराष्ट्रात तपास युद्ध: धाडी, धडकी आणि 21 नेते

आरोप-प्रत्यारोप, तक्रार, चौकशी, छापेमारी, ईडी, पोलीस आणि राजकीय नेते यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र अनुभवत आहे.
 
महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेनंतर सत्ताधारी आणि विरोधक भाजप यांच्यात तीव्र संघर्षाला सुरुवात झाली. केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तर दुसऱ्याबाजूला आता महाविकास आघाडीने सुद्धा भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतं.
 
एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या या राजकारणात महाराष्ट्रातील एकूण 21 राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर चौकश्या सुरू आहेत किंवा गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 , शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 1 आणि भाजपच्या 7 नेत्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या राजकीय संघर्षात काँग्रेसच्या नेत्यांची फारशी नावं चर्चेत नाहीत. त्यामुळे भाजपकडून केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेलाच टार्गेट का केलं जात आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
आतापर्यंत अशा कोणत्या नेत्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत किंवा कोणत्या नेत्यांविरोधात चौकशी सुरू आहे. याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा,
 
1. नवाब मलिक
महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाने अटक केल्यानंतर आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत. बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण आणि 'D-गँग' संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे.
 
23 फेब्रुवारीला नवाब मलिक ईडीने त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेतलं. त्यानंतर मुंबई हाय कोर्टाने त्यांना ईडीची कोठडी सुनावली. त्यांच्यावर अद्याप चौकशी सुरू आहे. तसंच दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात इतर तपास यंत्रणांकडून तपास केला जाऊ शकतो.
 
नवाब मलिक यांनी मुंबई हाय कोर्टात त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला आव्हान दिलं होतं. परंतु त्यांना दिलासा मिळाला नाही.
 
2. अनिल देशमुख
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी जवळपास 15 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. गेल्या साडेचार महिन्यांपासून अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांची जामीन याचिका मुंबई सेशन कोर्टाने नुकतीच फेटाळली आहे.
 
100 कोटी रुपयांची खंडणी आणि मनीलाँड्रींग प्रकरणी त्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.
 
फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी आढळून आली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण विधानसभा अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर राज्यासह देशाचं लक्ष याकडे वेधलं गेलं.
 
त्यानंतर घडलेल्या घडामोडींमधून अँटिलिया स्फोटक प्रकरणाचे धागेदोरे सुरुवातीला मुंबई पोलिसांतील गुन्हे शाखेतील अधिकारी सचिन वाझे, पुढे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि नंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. अखेरीस वाझे यांचं निलंबन-अटक, सिंह यांची बदली-गयब आणि देशमुख यांच्या राजीनामा ते अटक या घडामोडींनी हे प्रकरण गाजत आहे.
 
दरम्यान, अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.
 
3. अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाने काही महिन्यांपूर्वी छापेमारी केली. यात काही संपत्तीवर आयकर विभागाने जप्तीची कारवाई केल्याचं समजतं.
 
अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
भाजप नेते नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी आरोप केले होते. अजित पवार यांची आर्थिक उलाढाल आश्चर्यकारक आहे, असं सोमय्या म्हणाले होते. बिल्डरांकडून त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात शंभर कोटींहून अधिकची अपारदर्शक बेनामी संपत्ती असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
राज्याच्या एँटी करप्शन ब्यूरोने सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लिन चीट दिली होती. पण, अंमलबजावणी संचलनालयाने मे 2020 विदर्भ सिंचन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी सुरू केली आणि ती अद्याप सुरू आहे.
 
तसंच साधारण दोन महिन्यांपूर्वी आयकर विभागाने अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर छापेमारी केली होती.
 
दरम्यान, अजित पवार यांच्या नातेवाईकांवरील या छापेमारेतून आयकर विभागाने 184 कोटी रुपयांची बेनामी आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला होता.
 
4. प्राजक्त तनपुरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही ईडीने नोटीस बजावली असून 28 फेब्रुवारीला प्राजक्त तनपुरेंच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली.
 
अंमलबजावणी संचालनालयाने डिसेंबर महिन्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.
त्यावेळी त्यांची 9 तास चौकशीही झाली. तनपुरेंची एकूण 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं समजतं.
 
प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. ते प्रसाद साखर कारखान्याचे चेअरमनही आहेत. तसंच प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत.
 
5. एकनाथ खडसे
चार दशकांहून अधिककाळ भाजपमध्ये सक्रिय काम केलेले आणि आता भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भोसरी जमीन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केली होती. एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली असून ते ईडीच्या कोठडीत आहेत.
 
यापूर्वी खडसेंनी यासंदर्भात माहिती देताना म्हटलं होतं, "30 डिसेंबर 2020 रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स मला ED ने दिलं आहेत. त्यानुसार मी हजर राहणार आहे."
"भोसरी भूखंडप्रकरणी ही नोटीस आली आहे. मुळात तो भूखंड माझ्या पत्नीने खरेदी केला आहे. याची आतापर्यंत चारवेळा चौकशी झाली आहे. आता ही पाचव्यांदा चौकशी होतेय. हा व्यवहार पाच कोटींचा आहे. त्या पाच कोटींप्रकरणी ही चौकशी आहे," अशी माहिती खडसेंनी दिली.
 
6. संजय राऊत
"आम्ही प्रतिकाराची भूमिका घेतल्यानंतर माझ्यावर आणि माझ्या आसपासच्या लोकांवर ईडीच्या धाडी पडण्यास सुरुवात झाली," असा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
 
किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या मुलींची वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक असून संजय राऊत यांनी ही बाब लपवल्याचा आरोप केला आहे. एका बड्या उद्योजकासोबतही त्यांच्या मुलींची व्यवसायिक भागीदारी असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
 
सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असून त्यांचा कोव्हिड सेंटर घोटाळ्यात सहभाग असल्यातही आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पुण्याची शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आणि नंतर आठ शिवसैनिकांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले. यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर टीका केली आहे.
"ईडी भाजपचे एटीएम मशीन बनली आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली जात आहे," असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. "फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच केंद्रीय यंत्रणांच्या धाडी का पडत आहे," असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
तसंच पीएमसी बँकेच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीज बजावली होती. तसंच त्यांचा जबाबही नोंदवून घेतला आहे.
 
महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेच्या घडामोडीत संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
7. अनिल परब
अनिल देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांचं नाव समोर आल्यानंतर ईडीने त्यांची चौकशी केली होती. अनिल परब यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयातही बोलवण्यात आलं होतं.
 
ईडीने यासंदर्भात दोनदा समन्स बजावलं होतं. याआधी ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल परब यांनी चौकशीसाठी 14 दिवसांची मुदत मागितली होती. ईडीने ही विनंती मान्य केली होती.
तसंच दापोली येथे अनिल परब यांनी अनधिकृत रेसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणी अनिल परब यांच्यावर कारवाई होणार असा दावाही सोमय्या यांनी केला आहे.
 
अनिल परब हे 'मातोश्री'च्या जवळचे मानले जातात. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहे.
 
8. प्रताप सरनाईक
डिसेंबर 2020 मध्ये अंमलबजावणी संचलनालयाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने सरनाईक यांचे पुत्र विहंग यांचीही चौकशी केली होती.
 
यानंतर प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहलं होतं. सरनाईकांनी पत्रात म्हटलं, "कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल आणि शिवसेनेमुळे 'माजी खासदार' झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे, त्यालाही कुठेतरी आळा बसेल."
"आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसंमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल."
 
9. राहुल कनाल
युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर आयकर विभागानं छापा मारला होता. राहुल कनाल हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
 
राहुल कनाल हे सध्या शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी असून, मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचेही ते सदस्य आहेत.
या कारवाईवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "राहुल कनालवरील कारवाई चुकीची, हे दिल्लीचं आक्रमण आहे, यापूर्वीही असे हल्ले झाले आहेत. महाराष्ट्राच निवडणुका होत आहेत हे समजल्यावर तसंच महाविकास आघाडीची भाजपाला भीती वाटू लागल्यावर ही करण्यात आली. याआधी उत्तर प्रदेश, हैदराबाद, पश्चिम बंगालमध्ये अशीच कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्र झुकणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही"
 
10. भावना गवळी
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी ईडी, सीबीआय आणि केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर छापे टाकले.
 
नोव्हेंबर 2021 मध्ये शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट'मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केलं. या कथित गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले भावना गवळी यांचे निकटवर्तीयसईद खान यांची 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली आहे.
 
ईडीनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ट्रस्टमधून अफरातफर करण्यात आलेल्या पैशातून विकत घेण्यात आल्याचं चौकशीत समोर आलं आहे. ईडीने 11 मे रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशी संबंधितांविरोधात मनी लॅांडरिंगचा गुन्हा दाखल केला होता.
 
किरीट सोमय्यांचे आरोप भावना गवळी यांनी फेटाळले आहेत. भूखंड माफियांच्या गोष्टी आम्ही उघड करत असल्यामुळेच बाहेरचे लोक बोलवून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, असा आरोपही गवळी यांनी केला.
 
11. यशवंत जाधव
शिवसेनेचे मुंबईतील नेते, मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर 25 फेब्रुवारी रोजी सकाळी आयकर विभागाने छापे मारले. त्यांच्या सोबत CISF ची टीमही उपस्थित होती. कोव्हिड काळातला भ्रष्टाचार, शेल कंपन्यांद्वारे केलेली गुंतवणूक यासाठी आयकर विभागाने ही छापेमारी केल्याचं कळतंय.
आयकर विभागाने केलेल्या तपासात कोलकाता येथील शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिवसेना आमदार यामिनी जाधव, त्यांचे पती यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमावल्याचा दावा आयकर विभागाचा आहे.
 
12. अशोक चव्हाण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांप्रकरणीही चौकशी करण्यात आली होती.
 
ऑक्टोबर 2021 मध्ये बुलडाणा अर्बन बँकेवर छापे टाकून चौकशी सुरू करण्यात आली. बँकेने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची यावेळी चौकशी करण्यात आली.
ही कारवाई राजकीय हेतूनेप्रेरित असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. याआधीही चौकशी झाली असून काहाही आढळलं नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
13. नारायण राणे
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस पाठवली होती. राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी सुद्धा बीएमसीच्या पथकाने केली. मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं होतं, "नारायण राणेंच्या बंगल्याच्या प्रकरणात सीआरझेडचं उल्लंघन झाल्याचं केंद्र सरकारनंही म्हटलं आहे. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या पद्धतीनं काम करतील."
 
या संदर्भात नारायण राणे यांनी 19 फेब्रुवारीला स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले, या इमारतीचे आर्किटेक्ट हे नामांकित आहेत. बांधकामाला 13-14 वर्षे झाली असून त्यानंतर काम केलेलं नाही.
 
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांची नुकतीच मालवणी पोलिसांनी 9 तास चौकशी केली. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांवर आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दिशा सॅलियन यांच्या पालकांनीही याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती.
याप्रकरणी नारायण राणे यांना दिंडोशी कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी नारायण राणे मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होताच त्यांच्यावर कारवाई झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
 
कोकणात आशीर्वाद यात्रा सुरू असताना संगमेश्वरजवळ त्यांना अटकही करण्यात आली. त्यानंतर महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
 
14. देवेंद्र फडणवीस
गोपनीय डेटा उघड केल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी 13 मार्चला माजी मुखमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणातील साक्षीदार असूनही एखाद्या आरोपीप्रमाणे प्रश्न विचारण्यात आले असा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 
गृहमंत्री दिलिप वळसे-पाटील यांनी मात्र, हा जबाब साक्षीदार म्हणूनच नोंदवण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
"मला पोलिसांनी पाठवलेले प्रश्न आणि प्रत्यक्षात विचारण्यात आलेले प्रश्न यात गुणात्मक फरक होता." असंही फडणवीस यांनी म्हटलं.
 
महाराष्ट्रात गृह खात्यात बदल्याचं रॅकेट सुरू आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. यासंदर्भातील फोन रेकॉर्डिंग असलेलं पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करत केंद्रीय तपास यंत्रणेकडेही तक्रार केली होती.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला.
 
15. चंद्रशेखर बावनकुळे
माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधातही चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात ऊर्जा विभागाकडून झालेल्या काही कामांची चौकशी केली जाणार आहे.
 
महाविकास आघाडी सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून ही चौकशी केली जाणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेलं काम, खर्च, कंत्राटं, निविदा प्रक्रिया या सगळ्याची चौकशी केली जाऊ शकते. ते नागपूरच्या कामठी विधानसभा मतदार संघातून तीनवेळा भाजपचे आमदार राहिले आहेत.
 
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात त्यांना ऊर्जा आणि नंतर अबकारी ही दोन महत्त्वाची खातीही मिळाली होती.
 
16. गिरीश महाजन
माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे गिरीश महाजन यांच्या विरोधात पुणे आणि जळगाव येथे गुन्हा दाखल आहे.
 
जळगावची नूतन मराठा विद्या प्रसारक संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी दोन गटांमध्ये स्पर्धा सुरू होती. यासाठी दोन गट स्पर्धेत होते. ही संस्था हडप करण्यासाठी गिरीश महाजन यांनी भोईटे गटाला साथ दिली आणि बनावट पद्धतीने संस्था बळकावली असा आरोप पाटील गटाने केला आहे.
 
नरेंद्र पाटील यांचे लहान भाऊ अॅड.विजय पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आपलं अपहरण आणि मारहाण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तसंच चाकुचा धाक दाखवून संस्थेतून राजीनामा द्यायला सांगितलं असाही त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी कोथरुड आणि जळगाव दोन्ही ठिकाणी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणातील सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधातील काही व्हिडिओ क्लिप्स नुकत्याच विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी सादर केल्या होत्या. गिरीश महाजन यांच्याविरोधात कट रचण्यात आला होता असा आरोप भाजपने केला आहे.
 
17. प्रवीण दरेकर
भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर 'मुंबै जिल्हा सहकारी बँक वाद प्रकरणात अडचणीत आले आहेत. या प्रकरणी मुंबईतल्या 'रमाबाई आंबेडकर नगर' पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरेकर हे या सहकारी बँकेवर संचालक होते पण त्यांनी मजूर प्रवर्गातून उमेदवारी अर्ज केला होतका. हे समोर आल्यावर सहकार खात्यानं कारवाई करत त्यांची यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी रद्द केली. परिणामी प्रविण दरेकर आणि त्यांच्या गटाला मुंबै बँकेवरचं वर्चस्व गमवावं लागलं.
त्यानंतर दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरेकरांनी शक्यता लक्षात घेऊन अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 
18. नितेश राणे
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर संतोष परब हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यांना पोलीस कोठडीही सुनावण्यात आली. यानंतर मुंबई हाय कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.
 
तसंच दिशा सॅलियन प्रकरणातही नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवणी पोलिसांनी त्यांची चौकशी केली. दिंडोशी न्यायालयाने त्यांना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.
अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. हा आमचा अधिकार आहे असं स्पष्टीकरण नितेश राणे यांनी याप्रकरणी दिलं आहे.
 
चार राज्यांत विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचा महाराष्ट्रातही विश्वास वाढला आहे. 'गोवा तो झांकी महाराष्ट्र अभी बाकी है' अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे आपल्या भाषणात केली. यापुढील सर्व निवडणुका भाजप एकहाती जिंकेल असंही ते म्हणाले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला एकही निवडणूक जिंकू देणार नाही असं म्हटलं आहे.
 
राज्यात आगामी काही महिन्यांत महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यादृष्टीने राज्यात राजकारण तापलं आहे. हा संघर्ष यापुढे सुरू राहिल आणि अशा प्रकारे नेत्यांची यादी वाढेल असंही चित्र महाराष्ट्रात आहे.
 
हे तीन नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवरील आरोप
 
1. हसन मुश्रीफ
 
ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून या साखर कारखान्याचे कागदपत्र 21 सप्टेंबर 2021 रोजी ईडी आणि आयकर विभागाकडे दिले आहेत.
हे आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी ते म्हणाले होते, "किरीट सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपचं षडयंत्र आहे. विशेषत: चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत." तसंच "सोमय्यांचा आरोप इतका खोटा की, त्यांची सीएची पदवी खोटी आहे की काय शंका येते. त्यांनी अभ्यास करावा." असाही पलटवार त्यांनी सोमय्यांवर केला आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत अशी हसन मुश्रीफ यांची ओळख आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ ते कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.
 
2. किरीट सोमय्या,नील सोमय्या
 
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या यांच्या खासगी कंपनीचे पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपीशी आर्थिक संबंध आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
यासंदर्भातील कागदपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडे दिले असून तक्रार केल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी पत्र लिहिल्याचं त्यांनी सांगितलं.
 
किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. संजय राऊत खोटं बोलत आहेत असं सोमय्या म्हणाले आहेत
 
3. रश्मी ठाकरेंवरील आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे 19 बंगले असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ही माहिती उद्धव ठाकरे यांनी लपवून ठेवली असाही आरोप सोमय्या यांचा आहे.
कोर्लई गावाचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी मात्र हा दावा फेटाळला असून याठिकाणी बंगले नसल्याचं म्हटलं आहे. याची पाहणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावाला भेटही दिली होती. बंगले नाहीत मग रश्मी ठाकरे यांचे बंगले हरवले का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे कोणतेही बंगले नसल्याचं स्पष्ट केलं होतं. असे बंगले आढळल्यास मी राजकारण सोडेन असंही ते म्हणाले होते.