1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 20 मार्च 2022 (10:08 IST)

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात साक्षीदाराने दिली महत्त्वपूर्ण साक्ष

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यामध्ये आज महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप असणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना आज ( शनिवार 19 मार्च ) झालेल्या सुनावणीमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे.
 
अंदुरे आणि कळसकर यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते तेथून फरार झाले अशी साक्ष प्रत्यक्षदर्शीने न्यायालयात दिली. दाभोळकर खून खटला पुण्यातल्या विशेष न्यायालयात सुरू आहे. या खटल्यामध्ये आत्तापर्यंत सनातन संस्थेशी निगडित असणाऱ्या ऍड संजीव पुनाळेकर, सचिन अंदुरे, शरद कळसकर डॉ. विजेन्‍द्रसिंह तावडे यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
 
या खटल्यामध्ये साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेणे सुरू आहे. आज महापालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाऱ्याची साक्ष नोंदवण्यात आली. या साक्षीदाराने आरोपींना ओळखले आहे. ही साक्ष या खटल्यामध्ये महत्वाची ठरणार आहे.
 
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयाने 15 सप्टेंबर 2021 रोजी पाच जणांवर आरोप निश्चित केले.
 
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
 
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आज सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नवंदर (यूपीए प्रकरणाचे विशेष न्यायाधीश) यांनी पाच जणांवर आरोप निश्चित केले.
 
त्यांनी आरोपी- वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना विचारले की, तुम्हाला गुन्हा मान्य आहे का? सर्वांनी 'नाही' असं उत्तर दिलं.

व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून तावडे, काळस्कर आणि अंदुरेने वकिलांशी चर्चा करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. ही मागणी न्यायालयाने फेटाळली. इतर दोन आरोपी पुनाळेकर आणि भावे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

तावडे, अंदुरे, काळस्कर आणि भावे यांच्यावर न्यायालयाने भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), 34 नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले.
 
पुनाळेकर विरोधात आयपीसी कलम 201 (पुरावे नष्ट करणे किंवा खोट्या सूचना देणे) अंतर्गत आरोप निश्चित केला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.