1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (21:37 IST)

मुक्तच्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठवण्याचे आवाहन

vishakha kavya
नाशिक :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी ‘विशाखा काव्य’ पुरस्कार देण्यात येतात. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत ज्या कवींचा पहिला कवितासंग्रह प्रसिध्द झाला आहे अशा कवींनी आपले कवितासंग्रह पाठवावेत, असे आवाहन आले आहे.
 
कवितासंग्रह पाठवताना कवीचा पहिलाच प्रकाशित कविता संग्रह असावा. पहिलाच कवितासंग्रह असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र कवीने जोडणे अनिवार्य आहे. कविता संग्रह मराठी भाषेतच असावा. यासाठी वयाची अट व कोणतेही प्रवेशशुल्क नाही. कविता संग्रहाची या आधी इ-आवृत्ती प्रकाशित झालेली नसावी. कविता संग्रहाच्या पाच प्रतीसोबत कवीचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक,  इ-मेल या तपशीलासह परिचयपत्र पाठवावे. कवितासंग्रह 31 डिसेंबर 2022 पर्यंत प्राप्त होतील अशा बेताने पोस्टानेच पाठवावेत. खाजगी कुरीयरने पाठवू नयेत. कविता संग्रह समक्ष येऊन देखील जमा करता येतील. निर्धारीत मुदतीत प्राप्त झालेल्या कवितासंग्रहांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतील. निवड न झालेले कवितासंग्रह कवींता परत पाठवले जाणार नाहीत. पहिला कवितासंग्रह असल्याचे प्रतिज्ञापत्र नसलेले कविता संग्रह विचारात घेतले जाणार नाहीत. कवी / प्रकाशक किंवा हितचिंतक या पैकी कोणीही कवितासंग्रह पाठवू शकतात. मात्र त्या सोबत कवीचा फोटो व कवीचे परिचयपत्र जोडणे आवश्यक आहे. कवितासंग्रहावर प्रकाशन वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असावे. प्रकाशन वर्ष नमूद न केलेले कवितासंग्रह पुरस्कारासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. अंतीम मुदतीनंतर प्राप्त झालेले कवितासंग्रह स्वीकारण्यात येणार नाहीत. एका स्पर्धकाचे त्याच वर्षात दोन कविता संग्रह प्रसिध्द झाले असतील तर पहिला कवितासंग्रह पाठवावा. कविता संग्रह प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार, समन्वयक, कुसुमाग्रज अध्यासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक – 422 222 या पत्त्यावर पाठवावेत. या पुरस्कारासाठी अधिकाधिक नवोदित कवींनी आपले कवितासंग्रह पाठवून सहभाग घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख आणि प्रा. डॉ. घोडेस्वार यांनी केले आहे. याबाबतचा तपशील विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.