आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाचा पत्ता क्लबवर छापा, १३ जणांवर गुन्हा दाखल
रावेर-रसलपूर दरम्यान जुगार खेळणाऱ्या पत्याच्या क्लबवर उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने छापा टाकत १३ जणांना जुगार खेळतांना अटक केली आहे. पोलिसांचा छापा पडल्यामुळे बहुतांश जुगाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. छाप्यात पाच लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे जुगार, सट्ट्यासह पत्ते खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
फैजपूरचे उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांना रावेर ते रसलपूर रस्त्यावर एका घरात झन्ना मन्ना म्हणजे जुगार खेळण्याचा पत्ता क्लब सुरु असल्याची माहिती मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे आयपीएस श्रीमती सिंग यांनी स्वता:च्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलीस कर्मचारी अनिल इंगळे, सुमित बाविस्कर यांना छापा टाकण्यासाठी रावेरात पाठविले. यावेळी रावेर पोलीस स्थानकाचे काही कर्मचारी सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकण्यात आला. यावेळी काही जुगारी गोल राऊंड मांडून झन्ना मन्ना, मांग पत्ता खेळत असल्याचे दिसले. पोलिसांनी जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळावरुन १६ मोटरसायकल, आठ विविध कंपनीचे मोबाईल, १७ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.
Edited By - Ratnadeep Ranshoor