राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले
केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्ष चिन्ह द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांना एक पत्र देत याविषयी माहिती दिली. आयोगाने यापूर्वीच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार" असे नाव दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार त्यांच्या पक्ष/गटाला महाराष्ट्र राज्यातील सर्व संसदीय मतदारसंघासाठी तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह देण्यात येत आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे.
'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"
महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor