शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (08:03 IST)

आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत डॉ. देविका पाटील यांनी मिळवला सर्वाधिक वेगवान भारतीय महिलेचा मान

आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत गेल्या दोन वर्षात सलग अव्वल स्थान पटकावणाऱ्या नाशिकच्या डॉ. देविका पाटील यांनी आणखी एका यशाला गवसणी घातली आहे.

कझाकिस्तानमध्ये १४ ऑगस्ट २०२२ रोजी ‘आयर्नमॅन’ पूर्ण अंतराच्या ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेत डॉ. देविका यांनी ३.८ किमी नदीमध्ये, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी मॅरेथॉन असे मिळून १२ तास ३५ मिनिटांच्या विक्रमी वेळेत ‘ट्रायथलॉन’ पूर्ण करून सर्वात वेगवान भारतीय महिलेचा मान मिळविला आहे.
 
नाशिक येथे शनिवारी (२० ऑगस्ट) झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात डॉ. देविका पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. देविका यांनी कझाकिस्तानमध्ये स्पर्धेदरम्यान आलेली आव्हाने आणि या स्पर्धेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास उलगडून सांगितला. या वेळी ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, सायकलिस्ट डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. शरद पाटील, डॉ. अनिता पाटील, चैतन्य वेल्हाळ, डॉ. सुशील पाटील उपस्थित होते.

डॉ. देविका पाटील म्हणाल्या, की कझाकिस्तानमधील वातावरण २२-२३ अंश सेल्सियस तापमानात होते. हे तापमान आमच्यासाठी अनुकूल होते. परंतु सायकलिंग करताना १८० किमीचा टप्पा पार करताना आमच्यासमोर जोरदार वाऱ्याचे आव्हान होते.
कझाकिस्तानमध्ये झाडांची संख्या कमी असून, समतल प्रदेश अधिक आहे. पूर्ण मार्गावर वाऱ्याचा वेग अधिक होता आणि वारा सतत दिशा बदलत होता. आम्हाला सायकलिंगसाठी अधिक शक्ती लागत होती. हे सर्वात मोठे आव्हान होते.
 
डॉ. देविका म्हणाल्या, कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांचा सर्वाधिक सहभाग दिसून आला. यंदा तब्बल १२० भारतीय एथलिट्सनी सहभाग घेतला होता. कझाकिस्तानचे सर्वाधिक स्पर्धक सहभाग झाले होते. भारतीय स्पर्धक दुसऱ्या क्रमांकावर होते. भारतीय स्पर्धकांचा सहभाग वाढल्याची सकारात्मक गोष्ट दिसून आली.
 
नाशिक येथील सुप्रसिध्द नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शरद पाटील व डॉ.अनिता पाटील यांची डॉ. देविका या कन्या आहेत. नाशिकमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्रवरा येथील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षण घेतले. २०२० मध्ये मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये डॉ. देविका यांनी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम केले. सध्या त्या क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. डॉ. देविका यांना पुणे येथील चैतन्य वेल्लाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. कझाकिस्तानच्या स्पर्धेत प्रशिक्षक चैतन्य वेल्लाळ यांच्यासह ३० एथलिट्स सहभागी झाले होते. यापूर्वी त्यांनी चार अर्ध आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत.
 
पुणे येथे झालेल्या अर्ध आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता. महाविद्यालयीन जिवनापासून डॉ. देविका विविध सायकल स्पर्धा, मॅरेथॉन व दीर्घ अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत सातत्याने भाग घेत आहे. त्यांनी गिर्यारोहण आणि सायकल चालवण्यापासून सुरुवात केली. ही आवड विकसित करण्यास आणि त्याचा पाठपुरावा करण्यात डॉ. शरद पाटील यांचा मोठा वाटा आहे.
 
वैद्यकीय अभ्यासाचा समतोल साधत असताना ४ वर्षांपूर्वी ट्रायथलॉन्स करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून अनेक कार्यक्रमांमध्ये पोडियम फिनिशर म्हणून सातत्य राखत आहे.
पूर्ण अंतराच्या ट्रायथलॉनसाठी प्रशिक्षण हे आव्हानात्मक काम आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेसोबत प्रशिक्षणासाठी आठवड्याला दररोज दोन ते अडीच तास आणि आठवड्याच्या शेवटी पाच ते सात तास द्यावे लागली. तंदुरुस्त राहण्यासाठी त्या विशिष्ट आहार घेत असून, झोपेच्या वेळाही पाळत आहे.