मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मार्च 2022 (08:42 IST)

इस्रायल मराठवाड्यासाठी जल व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करणार

Israel will cooperate in the field of water management for Marathwada
मराठवाड्यातील पाण्याच्या  दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची  माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
 
कोविडमुळे लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे अशी विनंती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली.
 
इस्रायलच्या एशिया पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज सध्या भारत भेटीवर आले असून त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
 
बैठकीला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी व राजकीय सल्लागार अनय जोगळेकर उपस्थित होते.
 
इस्रायल येथे फार कमी पाऊस पडतो. मात्र सूक्ष्म जलव्यवस्थापनासाठी इस्रायल पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे.  इस्रायल येथे मोठ्या प्रमाणावर खाऱ्या पाण्याचे निःक्षारीकरण केले जाते तसेच वापरलेल्या पाण्यापैकी ८५ टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यामुळे  आज आपला देश पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर जॉर्डनलादेखील पाणी निर्यात करीत असल्याचे  राफाएल हर्पाज यांनी राज्यपालांना सांगितले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणारे पहिलेच पंतप्रधान असून इस्रायलचे पंतप्रधानदेखील यावर्षी भारतभेटीवर येणार असल्याचे हर्पाज यांनी यावेळी सांगितले.
 
शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर असून आज अनेक भारतीय विद्यार्थी व संशोधक इस्रायल येथे शिक्षण संशोधन करीत असल्याचे हर्पाज यांनी सांगितले. क्रिकेट आणि फूटबाल या क्रीडा क्षेत्रातही इस्त्रायल कामगिरी करत आहे.