बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2019 (16:35 IST)

हा तर तरूणाचा खोडसाळपणा

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 'दुश्मन पर फतेह', JIHAD-UL-AKBAR-TAEGET DADAR SHIDHI VINAYAYAK “BOOM”', असा संदेश ठाण्याच्या विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये लिहिल्याचे आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. मात्र हा संदेश कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले. मैत्रिणीबरोबर असलेले संबंध दुरावल्याने तिला धडा शिकवण्यासाठी एका तरूणाने खोडसाळपणा केला आहे. 
 
विक्रोळी येथे राहणाऱ्या केतन घोडके नामक तरुणाने हा संदेश जाणूनबुजून मॉलच्या बाथरूम मध्ये लिहला होता व त्याखाली आपल्या मैत्रिणीचा नंबर त्याने लिहून ठेवला होता. सदर नंबरवर पोलिसांनी फोन करून पडताळणी केली असता तो ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणीचा असल्याचे समजले. पोलिसांनी या तरुणीस पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली, यावेळी आपला जुना मित्र मला काही दिवसांपासून त्रास देत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी केतनला विक्रोळी येथून ताब्यात घेतले. केतनने आपण मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी हा संदेश लिहला होता अशी कबुली दिली.