करूणा शर्मांचे मंत्री धनंजय मुंडेंना आव्हान; म्हणाल्या, २०२४ ला…
काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीत करूणा शर्मा उतरणार आहे. शिवशक्ती पक्षाची स्थापना झाल्यानंतर आता त्या याच पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण या पोटनिवडणूकीसोबतच २०२४ ला करूणा शर्मा बीड (Beed) मधून धनंजय मुंडे यांच्या विरूद्ध निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
करूणा शर्मा यांनी निवडणूक बिनविरोध करायची असेल तर कॉंग्रेसने मला पाठिंबा द्यावा असे म्हटले आहे. दरम्यान चंद्रकांत जाधव यांच्या श्रद्धांजली सभेत पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा विचार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील यांनी बोलून दाखवला होता. पण भाजपाने सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. तसेच काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
कोण आहे करूणा शर्मा ?
करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मागील वर्षी मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्याचा स्वीकर देखील केला. धनंजय मुंडेंनी त्यांचे करूणा सोबत कधीपासून संबंध होते याचादेखील खुलासा केला आहे. करुणा शर्मा-धनंजय मुंडे यांना दोन मुलं आहेत. दरम्यान रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली आहे.
दरम्यान, निवडणूक आगोयाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २४ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २८ मार्च असून १२ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.