रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (15:37 IST)

मृतदेह नष्ट करायला गेलेला मारेकरीही दरीत कोसळला, मित्र अडकला; नेमकं प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे.
 
यामध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात मारेकरीही मृत्यूमुखी पडला आणि त्याला मदत करत असलेला मित्र या प्रकरणात अडकला, असं हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे.
 
विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या मित्राने स्वतः पोलिसांना दिली.
 
यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी तपास सुरू केला असता आंबोलीच्या खोल दरीत त्यांना दोन मृतदेह आढळून आले.
 
दोन्ही मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील रहिवासी असलेला तरूण सुशांत खिल्लारे याने कराडच्या भाऊसाहेब माने (वय 34) सोबत एक आर्थिक व्यवहार केला होता.
 
भाऊसाहेब माने याचा कराडमध्ये वीटभट्टीचा व्यवसाय आहे. वीटभट्टीवर कामासाठी आवश्यक असलेले कामगार पुरवण्यासाठीचं कंत्राट त्याने पंढरपूरच्या सुशांत खिल्लारेला दिलं होतं. त्यासाठी भाऊसाहेबने त्याला तीन लाख रुपयेही दिले.
 
पण, पैसे घेतल्यानंतरही सुशांतने वीटभट्टीवर कामगार पुरवले नाहीत. शिवाय, घेतलेले पैसे परत देण्यासही टाळाटाळ केली, यावरून दोघांमध्ये वितुष्ट आलं होतं. यासंदर्भातली माहिती त्याने आपला मित्र तुषार पवार यालाही दिली.
 
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, भाऊसाहेब एका वर्षापासून सुशांतकडे पैशांबाबत विचारणा करायचा. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही पैसे परत मिळत नसल्यामुळे त्याने मित्र तुषार पवारसोबत एक कट रचला.
 
भाऊसाहेब माने आणि तुषार पवार यांनी सुशांत खिल्लारेचं 19 जानेवारी रोजी पंढरपूरवरून अपहरण केलं. त्यानंतर तब्बल 10 दिवस त्यांनी कराडमध्येच त्याला एका घरामध्ये ठेवलं. 29 जानेवारी रोजी रात्री दारूच्या नशेत त्यांनी एका गाडीमध्ये खिल्लारेला जोरदार मारहाण केली. याचदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटात
मारहाणीनंतर सुशांत खिल्लारे निपचित पडला. हे पाहून भाऊसाहेब आणि तुषार यांची घाबरगुंडी उडाली.
 
सुशांत मृत्यूमुखी पडला, या विचारातून त्यांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आंबोली घाटात जाण्याचं दोघांनीही ठरवलं.
 
ठरल्याप्रमाणे, 30 जानेवारी रोजी भाऊसाहेब आणि तुषार त्याच्या गाडीने आंबोली घाटात गेले.
 
रात्रीच्या अंधारात भाऊसाहेब आणि तुषारने सुशांतचा मृतदेह गाडीतून बाहेर काढला.
 
रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावरून हा मृतदेह दरीत फेकून देत असतानाच भाऊसाहेबही तोल जाऊन दरीत कोसळला.
 
मागे राहिलेल्या तुषार पवारचा थरकाप
मारहाणीत सुशांत खिल्लारेचा खून झाल्यानंतर आता मित्र भाऊसाहेबही तोल जाऊन कोसळल्याचं पाहून तुषार पवारचा प्रचंड थरकाप उडाला. त्याने दरीत कोसळलेल्या भाऊसाहेबला काही वेळ हाक दिली.
 
भाऊसाहेब परत येण्याच्या अपेक्षेने त्याने रात्रभर तुषार पवार आंबोली घाटातच वाट पाहिली. घाबरून जाऊन तुषार रात्रभर तिथेच गाडीत बसून राहिला.
 
मात्र, अखेरीस दुसऱ्या दिवशी (31 जानेवारी) घाबरून त्याने यासंबंधित सगळी माहिती भाऊसाहेब मानेच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांमार्फत पोलिसांना ही माहिती मिळाली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. हा सगळा घटनाक्रम पोलिसांसमोर कथन करणारा तुषार पवार यांचा एक व्हीडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. मात्र, बीबीसी मराठी या व्हीडिओची पुष्टी करत नाही.
 
एक खून, मित्रही कोसळला, तुषार पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणाची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला 31 जानेवारीला मिळाली. त्यांनी तत्काळ याची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दरीत उतरून पोलिसांनी शोध घेतल्यावर त्यांना एक नव्हे तर दोन मृतदेह सापडले. यामुळे पोलीस देखील चक्रावले.
 
यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई ,पोलीस कॉन्स्टेबल दीपक नाईक, दीपक शिंदे, तसेच आंबोली रेस्क्यू टीमचे मायकल डिसूजा, उत्तम नार्वेकर, हेमंत नार्वेकर, विशाल बांदेकर, संतोष पालेकर, राजू राऊळ, अजित नार्वेकर आदी उपस्थित होते.
 
यादरम्यान, तुषार पवार एका कोपऱ्यात गाडीसोबत थांबला होता. पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं असून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.