सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जानेवारी 2018 (17:02 IST)

पतंगाची 'उडाण'; विद्युत सुरक्षेबाबत सावधान

मकर संक्रांतीचा सण आठवडाभरावर आला असून आकाशात रंगीबेरंगी पतंगांचा संचार वाढत आहे. पतंग उडविताना पतंगाचा मांजा वीज तारांमध्ये अडकून तसेच तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात प्राणांतिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना लघु व उच्च दाबाच्या वीज वाहिन्या, फिडर व वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगावी व विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.संक्रांतीनिमित्त लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र पतंग उडविताना उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. शहरासह ग्रामीण भागात वीज वितरणासाठी लघु व उच्च दाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. लहान मुले व युवकही वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवितात. अनेकवेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अतिउत्साही तरुण व लहान बालकेही असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. वीज तारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा दहा वर्षीय बालकाचा प्रयत्न जीवावर बेतल्याची घटना गेल्याच महिन्यात शहरात घडली आहे. असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांना धोक्याची पूर्वकल्पना देऊन अधिक सजग राहणे आवश्यक ठरते.
 
सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातूमिश्रित रसायनांचे कोटिंग (आवरण) असल्याने वीज तारांच्या संपर्कात येताच या मांजात वीज प्रवाहित होऊ शकते. त्यातून दुर्घटनेसह वीज वितरण यंत्रणेत बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतणारे ठरू शकते तसेच वीज वाहिन्यांमध्ये पतंग अडकून शॉर्टसर्किट होऊन तासंतास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पतंग उडविताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
 
हे लक्षात ठेवा
 
 · वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतू शकते.
 
 · वीज तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा अट्टाहास करू नका.
 
 · वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका.
 
 · धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा.
 
 · दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका.