मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: खामगाव ( बुलडाणा ) , मंगळवार, 2 जानेवारी 2018 (15:34 IST)

कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद, राष्ट्रीय महामार्गावर फोडली एसटी

पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचा निषेध करण्यात येत आहे. याचे पडसाद खामगाव तालुक्यातही उमटले. निषेध म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री गवळी येथे एका एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
एमएच-१४ बीटी -३२७४ या अकोला-नाशिक या बसवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीदरम्यान बसमध्ये २६ प्रवासी तसेच चालक आणि वाहक होते. या प्रकरणी चालकाने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, बसमधील प्रवासी सुखरूप असून एसटी बस खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात आणण्यात आली आहे.  
 
अकोल्यात तीव्र पडसाद
दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला.अकोला शहरात काही युवकांनी सातव चौक, जठारपेठ, राऊतवाडी, लहान उमरी, रतनलाल प्लॉट चौक, केडीया प्लॉट, नवीन कपडा बाजार परिसरातून मोर्चा काढला व बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर आकोट व लोहारा येथे काही युवकांनी बसची तोडफोड केली. दरम्यान, सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे.
 
मुंबईतही हिंसक पडसाद
भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईमध्येही हिंसक पडसाद उमटले आहेत. कुर्ला, मुलुंड व चेंबूर परिसरात निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मुलुंडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टेशन रोड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.