मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (16:28 IST)

क्यार चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, जनजीवन विस्कळीत

कोकण किनारपट्टीसह गोव्यालाही क्यार चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यामुळे मालवण, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी पाणी साचले असून, अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याने  जनजीवन विस्कळीत झालं आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने याचा फटका मच्छिमारांना बसला आहे.
 
 मालवणमध्ये पावसाने हाहा:कार उडवला असून सर्व रस्ते जलमय झाले आहेत.अनेक घरांनाही पाण्याचा वेढा घातला आहे. वादळामुळे समुद्रही खवळला आहे. खवळलेल्या समुद्राचे पाणी ही वस्तीत शिरले आहे. मालवण बाजारपेठेत पाणी शिरले आहे. भंडारी हायस्कूल ते भाजी मार्केट अंबिका कॉम्प्युटर, हॉटेल सागर किनारा एवढ्या भागात एक फूट पाणी साचले आहे. सिंधुदुर्गातही अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
 
क्यार चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत कोकण किनारपट्टीवरील ग्रामस्थांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर मच्छिमारांना दोन दिवस समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय, कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही काही दिवस कोकणात न येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.