डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम फोडून लाखोंची रोकड केली लंपास
एटीएम लुटीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, अनेकदा चोरट्यांचा हा प्रयत्न फास्ट तर अनेकदा तो यशस्वी देखील होतो.
यामुळे एटीएम मशीनची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येऊ लागले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे.
अज्ञात चोरट्याने डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून या मशिनमधील 3 लाख 17 हजार रुपयांची रोकड व 2 हजार रुपये किंमतीचा डिव्हीआर चोरुन नेल्याची घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे घडली आहे.
समनापूर येथील राजेंद्र रोकडे यांच्या मालकीच्या गाळ्यामध्ये इंडीया वन लिमीटेड या कंपनीचे एटीएम मशिन आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अज्ञात चोरट्याने काल पहाटे डिटोनेटरचा स्फोट घडवून हे मशिन फोडले.
या मशिनमधील रक्कम घेवून त्याने पोबारा केला. एटीएम मशिन फोडल्याबाबतची घटना सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली.
कामगार पोलीस पाटील गणेश शरमाळे यांनी या चोरीची माहिती शहर पोलीस ठाण्यात कळविली. याबाबत धर्मेंद्र वर्मा यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाने करत आहे.