मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा; पाणी पातळी खालावली
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारातील लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने परिसरातील, विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिक सांगू लागले आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारातील खैरदरा परिसरातील नदीपात्रामध्ये भराव टाकून रस्ता तयार केल्या प्रकरणी महसूल विभागाने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र दोन दिवस होत नाही, तोच त्याच परिसरातील लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून पुन्हा वाळू उपसा सुरू झाला आहे. महसूल विभागाने दोन दिवसांपूर्वी खैरदरा परिसरात केलेली कारवाई फार्स असल्याची टीका स्थानिकांनी केली.पठारभागातून जाणार्या मुळापात्रातील नांदूर खंदरमाळ परिसरातील नदीकाठच्या भागातून मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा होतो.
नुकतेच मुळा पात्रात वाळू मुरूम टाकून नैसर्गिक नदीपात्रामध्ये भराव तयार करून मुळा पात्राचे विद्रुपीकरण केल्या प्रकरणी महसूल विभागाने दोन जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरीही परिसरातील अन्य वाळू तस्करांवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. रविवार (20 फेबु्रवारी) दुपारी लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून जे.सी.बी मशिनच्या सहाय्याने पुन्हा वाळूउपसा सुरू होता.
याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी विरोध करताच वाळू तस्करांवर जे.सी.बी मशिन घेऊन नदीपात्रातून पळ काढला. महसूल अधिकारी अधूनमधून कारवाई करत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात हाती काही लागत नाही आणि वाळू चोरीही थांबत नाही,अशी परिस्थिती आहे. पथक येणार असल्याची माहिती चोरांना आधीच मिळते, त्यामुळे त्यांना पळून जाण्याची संधी मिळत असल्याचेही गावकरी सांगतात.