कर्णबधिरांच्या मोर्चावर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज त्यांच्यावर होणार कारवाई
पुणे येथे समाज कल्याण आयुक्ताल समोर सुरु असलेल्या कर्णबधिरांच्या मोर्चावर पुणे पोलिसांनी अमानुष असा लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जचे पडसाद आज विधानसभेत जोरदार उमटले विरोधकांनी सरकारवर टीका केली. तर सरकारच्यावतीने सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत निवेदन करत सांगितले की मूकबधिर आंदोलकांच्या अनेक मागण्या मान्य केल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून हे अधिवेशन संपण्याआधी मूकबधिर, कर्णबधिर संघटनेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करणार आहोत. या उत्तरावर मात्र विरोधकांनी असमाधान व्यक्त करत लाठीचार्ज करणार्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती.
विधानसभा अध्यक्षांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत सरकारला पुन्हा या विषया निगडीत निवेदन देण्यास सांगितले. त्यानंतर संसदिय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सात दिवसाच्या आत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बडोले यांनी दिलेल्या निवेदनावर आक्षेप घेतला आणि ते म्हणाले की दिव्यांगांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्याची आवश्यकता होती का? सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्र्यांनी माफी मागायला हवी आहे. घटनेची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे व जे अधिकारी दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी करा, अशी मागणी केली आहे.