शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (08:48 IST)

विधान परिषद निवडणूक: भाजपकडून उमेदवारांची घोषणा; यांना मिळाली संधी

भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यात धुळे-नंदुरबार, मुंबईतील दोन, कोल्हापूर, नागपूर, अकोला-बुलडाणा-वाशिम या जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या या सहा जागांची मुदत येत्या मुदत 1 जानेवारी, 2022 रोजी पुर्ण होत आहे. त्यात सध्या  धुळे-नंदुरबार मध्ये अमरिशभाई पटेल, मुंबईत काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम, कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील, नागपूरमध्ये भाजपचे गिरीश व्यास, अकोला-बुलडाणा-वाशिम येथे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे आमदार आहेत.  या रिक्त होणा-या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आल्याने आचार संहिता लागू झाली आहे.
 
या निवडणूकीची अधिसूचना 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिवस दि. 23 नोव्हेंबर (मंगळवार) 2021 आहे. दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर,2021 असा आहे.
 
या मतदार संघांसाठी शुक्रवार, दिनांक 10 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मंगळवार, 14 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी होणार असून गुरुवार, 16 डिसेंबर, 2021 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. भाजपने कोल्हापूरमधून अमल महाडीक, धुळे-नंदुरबार मध्ये अमरिश पटेल, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे, अकोला-वाशीम मध्ये वसंत खंडेलवाल आणि मुंबईतून राजहंस धनंजय सिंह यांना उमेदवारी घोषित केली आहे.