1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (08:34 IST)

दुबई एक्सपोमध्ये ६ चित्रपट, एक मराठी वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दाखविण्यात येणार

दुबई येथे 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान सहा चित्रपट, एक मराठी वेबसिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दुबई एक्सपोमध्ये दाखविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
दुबईच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 18 ते 23 दरम्यान दुबई एक्सपोचे आयोजन केले आहे. या एक्स्पोसाठी महाराष्ट्रातून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे सहभागी झाले आहेत.
 देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राचे सांसकृतिक वैभव ( संगीत, नाटक, लोककला, सिनेमा, सांस्कृतिक परंपरा) याची झलक या एक्स्पोमध्ये दाखविण्यात येईल. कडू गोड, तक तक, ताजमहल, बारडो, गोष्ट एका पैठणीची, गोदाकाठ असे ६ चित्रपट, वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा यावेळी दाखविण्यात येणार असून यामध्ये २० लोककलाकार सहभागी होणार आहेत.
या एक्सपोदरम्यान महाराष्ट्रामध्ये चित्रीकरणासाठी एक खिडकी योजनेद्वारे काय सुविधा देण्यात येतात, महाराष्ट्रात चित्रीकरण कसे चालते, येणाऱ्या काळात नेमक्या काय सुविधा असणार आहेत याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या गोलमेज चर्चासत्रात देणार आहेत.
दुबई एक्स्पो गेल्या वर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार होता, परंतु कोविड या जागतिक महामारीमुळे हा एक्स्पो गेल्या वर्षी आयोजित ना करता यावर्षी आयोजित करण्यात आला आहे.