शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2019 (09:52 IST)

बिबट्या राष्ट्रीय संपत्ती असून अधिवासातील त्याचे अस्तित्व मान्य करायलाच हवे

किटक आणि जैव विविधता महोत्सवातून उमटला सूर
 
बिबट्या हा प्राणी आपली राष्ट्रीय संपत्ती असून, अधिवासातील त्याचे अस्तित्व मान्य करावेच  लागेल असा सूर किटक आणि जैव विविधता महोत्सवातून उमटला आहे. मुळात बिबट्या हा अत्यंत लाजाळूप्राणी असून त्याच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होत नाही तो पर्यंत बिबट्या कोणत्याही प्रकारे मनुष्याला हानी पोहोचवत नाही अशी माहिती अभिजित महाले (इको फौंडेशन आणि शरण फॉर अॅनिमल्स) यांनी दिली. यावेळी महोत्सवात बिबट्या आणि मनुष्य या दोघांच्या नात्यावर आधारीत माहितीचे सादरीकरण त्यांनी केले.
 
रोटरी क्लब (सर्व नाशिक शाखा) तर्फे आणि ग्रेप काउंटी बायोडायवर्सिटी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने देश आणि राज्यातील पहिला असलेला  इंसेक्ट अॅण्ड बायोडायवर्सिटी फेस्टिवल अर्थात किटक आणि जैव विविधता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. किटक आणि जैव विविधता महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. वर्ल्ड नेचर कॉन्झर्वेशन डे च्या निमित्ताने रविवारी महोत्सव पार पडला.
 
यावेळी किटक आणि जैव विविधता महोत्सवाचे प्रमुख मनिष ओबेरॉय, ग्रेप काउंटी बायोडायवर्सिटी पार्कचे संचालक  किरण चव्हाण, रोटरी क्लब  ३०३० चे  गव्हर्नर राजेंद्र भामरे , रो. गुरमित सिंग रावल ( इंक्लेव चेअरमन) रो. कैलास क्षत्रिय ( असिस्टंट गव्हर्नर), रो.गौरांग ओझा (असिस्टंट गव्हर्नर), रो. मनीषा जगताप (असिस्टंट गव्हर्नर), रो. वैशाली प्रधान (असिस्टंट गव्हर्नर) व तेजस चव्हाण, अक्षय धोंगडे आदी उपस्थित होते.   
 
अनेकदा शहरी भागात बिबट्या आला की त्याला बघण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या गर्दीमुळे बिबट्या घाबरतो आणि स्वरक्षणासाठी  हल्ला करतो. म्हणूनच अशा वेळी गर्दी करण्यापेक्षा सर्वांनी सामाजिक भान जपत यंत्रणेला त्यांचे काम करू दिले पाहिजे. सोबतच बिबट्याच्या जवळ जाऊन फोटो, चित्रफित घेणे हा मुर्खपणा असून तो कधीच करू नये असे मत महाले यांनी व्यक्त केले.
 
मनुष्याप्रमाणे बिबट्या सुद्धा याच अधिवासाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचे अस्तित्व नाकारणे अत्यंत चुकीचे आहे. डिसेंबर ते मार्च बिबट्याचा प्रणय काळ असतो. तेव्हा बिबटे मोठे मार्गक्रमण करतात. सावरकर नगर येथे आढळून आलेला बिबट्या हा सकाळी परतीला निघाला होता. मात्र कोणीतरी पाहिले आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. त्यावेळी बिबट्याने मुद्दाम कोणावरही हल्ला केला नाही तर तो गर्दीने घाबरला म्हणून तसा प्रकार घडला असे महाले यांनी स्पष्ट केले.
 
महोत्सवात उपस्थित नागरिकांना परिसरातील विविध झाडे, त्यांचे महत्व यावेळी सांगण्यात आले. सोबतच कोणत्या झाडावर कोणता पक्षी असतो, मुंग्या फक्त उन्हाळ्यात का दिसतात हे स्पष्ट करून सांगण्यात आले. चीनमध्ये अनेक राज्यात मधुमक्षिका नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे तेथील शेतीवर मोठा परिणाम झाला असून ही मानवासाठी धोक्याची घंटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
 
परिसरात असलेल जंगल मायना, ब्राह्मणि माइना, क्रेस्टेड लार्क, रुफस टेल लार्क, मॅग्पी रॉबिन, इंडियन रॉबिन, पर्पल सनबर्ड, रेड वॅटलेड लॅपिंग, लाफिंग डोव हे पक्षी दाखवत त्यांची पूर्ण माहिती दिली गेली. तर किटक ग्रासहूपर, कॅटेडीडस, बीटल्स, ड्रॅगनफ्लाईज, डॅमस्लिज, बग्स, विविध फुलपाखरे, पतंग, वृक्षापोटी, मुंग्या, हनीबीज, वापास, प्रीईंग मांटिस,  वोकिंगस्टिक, वॉटर स्टार, स्टिक इंसेक्ट  आदींची माहिती देण्यात आली. 
 
महोत्सवातील तज्ञाकडून सर्व नागरिकांना आवाहन :
 
निसर्गाने नाशिकला समृद्ध बनविले आहे.  अनेक प्राणी, पक्षी, कीटके उत्तम प्रकारे राहतात. मात्र अनेकदा गैरसमज आणि अंधश्रद्धा यामुळे अनेक प्राणी मारले जातात. असाच प्राणी आहे मॉनिटर लिझर्ड अर्थात घोरपड होय.  घोरपडीला पकडून तिला मारले जाते. तिचे अवयव विकले जातात. घोरपड ही फार उपयोगी असून निसर्गातील उघडे मांस खाऊन ती जीवन जगते. घोरपडीची  तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. असे प्रकार कुठे घडत असतील तर त्वरित पोलिस व वनविभागाला कळवायला हवे. 
 
प्रतिक्रिया :
 
यावर्षी आम्ही बिबट्या आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष अधोरखित केला आहे. गैरसमज दूर करून आपण नाशिक जिल्ह्यातील अनेक बिबटे वाचवू शकतो. बिबट्या आपली ओळख असून आपला निसर्ग संपन्न असल्याचे लक्षण आहे. त्यामुळेच रोटरी क्लबच्या मार्फत बिबट्या आणि इतर प्राणी वाचवण्यासाठी जनजागृती सुरु केली आहे. – मनिष ओबेरॉय, महोत्सव प्रमुख, नाशिक