सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (15:18 IST)

अजित पवारांना दसऱ्याची भाषणं ऐकणं, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकणं हेच काम राहिलंय

ajit pawar
शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यात नवीन सरकार आल्यापासून विरोधकांवर खोचक शब्दांत टोलेबाजी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यातील भाषणांसंदर्भात केलेल्या विधानावरून शहाजीबापूंनी विनोदी टिप्पणी केली आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
 
अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्यातल्या विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण एकाच वेळी सुरू झालं तर कुणाचं भाषण ऐकणार? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, “एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरू झाली तर मी आधी उद्धव ठाकरेंचं ऐकेन आणि नंतर एकनाथ शिंदेंचं ऐकेन. अर्ध्या तासाने काही फरक पडणार नाही.”
दरम्यान, अजित पवारांच्या याच विधानाचा संदर्भ घेत शहाजीबापूंनी सांगोल्यात बोलताना खोचक टोला लगावला आहे. “अजित पवारांना आता ही दसऱ्याची भाषणं ऐकणं, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकणं हेच काम राहिलंय. भाषणं ऐकण्याशिवाय अजित पवारांना दुसरं काही काम उरलं नाहीये. ते विरोधी पक्षनेते झाले आहेत. पण ते कसं करायचं असतं ते त्यांना अजून कळत नाहीये. कारण अजित पवार कायम सत्तेवर राहिले आहेत. ते अजित पवारांना समजलं, पण हे अजून समजेना”, असं शहाजीबापू म्हणाले.

Edited by : Ratnadeep Ranshoor