शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (08:00 IST)

पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे?

पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनचा इशारा दिला. राज्‍यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. निर्बंध शिथिल केल्याने राज्यातील व्यवहार पूर्वपदावर येत असताना कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले.
 
अनेक लोक मास्‍क घालत नसतील किंवा आरोग्‍यविषयक नियम पाळत नसतील तर जिल्‍हा आणि पोलीस प्रशासनाने अजिबात दयामाया न दाखवता दंडात्‍मक कारवाई करावी’, असे निर्देशही ठाकरे यांनी दिले. ‘कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत’, अशी सूचना ठाकरे यांनी केली. 
 
पुढे उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ‘ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या. जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा आणि त्याची अंमलबजावणी करा.’
 
इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत. लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या आणि इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमाविना होताना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत. मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही.स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे,’ असे ठाकरे म्हणाले.
 
‘ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क आणि इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई करावी,’ असे ठाकरे यांनी सांगितले.