बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2019 (14:31 IST)

लोकसभा निवडणूक 2019 : भाजप कार्यकर्त्यांनी बुरखा घातलेल्या महिलांना मतदानापासून खरंच रोखलं का?

उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगर मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुरखा घातलेल्या महिलांना मतदान करण्यापासून रोखल्याचा कथित व्हीडिओ व्हायरल झाला आहे. खोटे आधार कार्ड दाखवून बुरखा घातलेल्या महिला मतदानाला आल्या होत्या, असा दावा या व्हीडिओतून करण्यात आला आहे.
 
गुरुवारी पहिल्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर हा व्हीडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात लोकसभेचं मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. बुरखा घालून काही महिला खोटं मतदान करत असल्याचा दावा मुझफ्फरनगरचे भाजपचे उमेदवार संजीव बलियान यांनी केला आहे.
 
फेसबुक आणि ट्वीटरवर हा व्हीडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. उजव्या विचारांच्या "BJP Mission 2019" आणि "We Support Narendra Modi" या फेसबुक ग्रुपवर हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. पण या लोकसभा निवडणूकिचा आणि व्हीडिओचा काहीही संबंध नसल्याचं समोर आलं आहे.
 
या व्हीडिओमागचं सत्य काय आहे?
"भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी बुरखा घातलेल्या महिलांना खोटं मतदान करताना पकडलं," असं व्हायरल झालेल्या व्हीडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. पण हा व्हीडिओ बारकाईनं ऐकला तर वेगळीच माहिती समोर येते. "मी बसपची उमेदवार शैला आहे. महिलांना कोणताही त्रास होऊ नये असं मला वाटतं. म्हणून मला खरं सांगा की हे आधार कार्ड तुम्हाला कुणी दिलं?" असं शैला म्हणताना दिसतात.
 
बहुजन समाज पक्षानं 2017मध्ये फॅशन डिजाइनर शैला खान यांना उमेदवारी दिली होती. त्या त्यावेळी रामपूर पालिकेची निवडणूक लढत होत्या. नोव्हेंबर 2017मध्ये उत्तर प्रदेशातल्या पालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. हा  व्हायरल व्हीडिओ 27 नोव्हेंबर 2017ला पहिल्यांदा YouTubeवर अपलोड केलेला आहे. 26 नोव्हेंबरला UPच्या पालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं होतं. याबाबत कोणतीही बातमी आम्हाला सापडली नाही. पण हा व्हीडिओ 2019च्या लोकसभा निवडणुकीचा नक्कीच नाहीए.
 
निवडणुकीत आणखी खोटे दावे केले जात आहेत
आणखी एक व्हीडिओ शेअर केला जात आहे. त्यात पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीनंतर EVM मशिन जाळल्याचा दावा केला जात आहे. 35 सेकंदाच्या या व्हीडिओ क्लिपमध्ये काहीजण EVM मशिन जमिनीवर आदळत आहेत आणि त्याला आग लावत आहेत.
 
"पुंचमधल्या मंडी (काश्मीर) याठिकाणी EVM मशीन हॅक केल्यानं जाळण्यात आली. सगळी मतं भाजपला जात होती. चौकीदार चोर आहे," असं कॅप्शन देऊन हा व्हीडिओ पसरवला जात आहे. हाच व्हीडिओ नसरल्ला पोरा (काश्मीर) इथला असल्याच सांगून सगळी मतं भाजपला जात असल्याचा हा दावा केला आहे.
 
Daily India नावाचं एक फेसबुक पेज आहे. त्याला जवळजवळ 70 हजार फॉलोअर्स आहेत. त्या पेजनंही हा व्हीडिओ शेअर केला आहे. "लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातला हा व्हीडिओ आहे. दुसऱ्या पक्षासाठी मत टाकलं तरी भाजपलाच जात होतं म्हणून संतप्त जमावानं EVM मशीन जाळले." असं कॅप्शन या पेजने दिलं आहे. पण हा व्हीडिओ एप्रिल 2017चा आहे. 2019च्या निवडणुकीचा यात काहीही संबंध नाहीये.
 
नेमकं कशामुळं EVM मशीन जाळल्या होत्या?
श्रीनगर इथल्या पोट-निवडणुकीत, संतप्त जमावाने मतदान केंद्रावर हल्ला केला होता. त्याठिकाणी फुटीरवादी नेत्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात 33 EVM मशीन जाळल्या होत्या, असं मीडियाने रिपोर्ट केलं आहे.
 
तो व्हीडिओ मंडी किंवा नसरुल्ला पोरा इथला नक्कीच नाहीये. पहिल्या टप्प्यात केवळ बारामुल्ला आणि जम्मू लोकसभा मतदारसंघातच मतदान झालं आहे. नसरुल्ला पोरा हे ठिकाण श्रीनगर मतदार संघात येतं आणि या ठाकाणी 18 एप्रिलला मतदान होणार आहे.
 
पहिला दावा - भाजप कार्यकर्त्यांनी मुझफ्फरनगर मतदारसंघात खोटी आधार कार्ड घेऊन लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्या बुरख्यातल्या महिलांना अडवलं.
 
सत्यता - हा व्हीडिओ 2017चा आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकचा आणि काहीही संबंध नाही. व्हीडिओत भाजप कार्यकर्ते नसून त्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आहेत.
 
दुसरा दावा - भाजपला सगळी मतं जात असल्यानं लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्यावेळी EVM मशीन जाळल्या.
 
सत्य परिस्थिती- नाही, हा पण व्हीडिओ जुना आहे. निवडणूकिवार बहिष्कार घातल्यानं 33 EVM मशीन जाळण्यात आल्या होत्या.