शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2019 (10:33 IST)

लोकसभा निवडणूक 2019: रामदेव बाबा नरेंद्र मोदींपासून का लांब गेले?

पाच वर्षांपूर्वी रामदेव बाबांनी भाजपला केवळ पाठिंबाच दिला नव्हता तर ते भाजपच्या प्रचारातही सहभागी झाले होते. पण सध्या त्यांची राजकीय भूमिका बदललेली दिसत आहे.
 
2014च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी पत्रकारांशी बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, जर भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून घोषित केलं तर ते आगामी निवडणूक सहज जिंकू शकतात.
 
31 मार्च 2013 रोजी जयपूरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबांनी हे विधान केलं होतं.
 
त्यानंतर भाजपाच्या प्रचारासाठी रामदेव बाबांनी योग शिबीरं घेतली. एवढंच नाहीतर भाजपच्या नेत्यांकडून योगासनंही करून घेतली.
 
त्या दरम्यान नितिन गडकरींनी रामदेव बाबांच्या पाया पडून आशिर्वाद घेतले होते. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि रामदेव बाबांनी एकत्र गाणंही गायलं होतं. त्यावेळी रामदेव बाबांनी 'मोदींना मतं द्या' असं जाहीर आवाहन केलं.
 
हरियाणात भाजपची सत्ता आल्यावर रामदेव बाबांना राज्याचं ब्रँड अँबेसडर करून कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला होता.
 
रामदेव बाबांचं राजकारण
मग आता काय बदलंल?
 
आरोग्य चांगलं राहण्यासाठी रामदेव बाबा वेगवेगळी आसनं करतात. त्याच प्रमाणे ते देशातल्या राजकीय घडामोडी पाहून काही निर्णय घेत असल्याचं दिसत आहे.
 
2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर कोण पंतप्रधान होतील? असं विचारलं असता त्याविषयी आता काहीच सांगता येणार नाही, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत. डिसेंबर 2018मध्ये तामिळनाडूतल्या मदुराई येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
 
पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुंकाचे निकाल आल्यानंतर त्यांना हा प्रश्न विचारला होता.
 
सध्या रामदेव बाबा हे केवळ नव्वदीच्या दशकातले योग गुरु उरलेले नाहीत तर ते पतंजली आयुर्वेद या ब्रॅण्डचा हजारो कोटींचा कारभारही सांभाळत आहेत. लांब दाढी असणारे आणि भगवे कपडे घातलेले बाबा आता कोट्यावधींचा व्यवसायही सांभाळत आहेत.
 
हरिद्वारपासून 25 किमी दूर गेलं की रामदेव बाबांचं साम्राज्य रस्त्याच्या दोन्ही बाजुंना पसरलेलं दिसतं. त्याठिकाणी पंताजलीचे शाळा, दवाखाने, औषधांची फॅक्टरी असे अनेक उद्योग दिसतात.
 
मदुराईमध्ये बोलताना ते म्हणाले, "सध्या राजकीय परिस्थिती कठीण आहे. त्यामुळे पुढचा पंतप्रधान कोण असेल. देशाचं नेतृत्व कोण करेल याविषयी आता सांगणं अवघड आहे."
 
'मी आता सर्व पक्षांचा'
मी आता सर्वपक्षीय आहे आणि अपक्ष आहे, असंही ते म्हणाले आहेत.
 
यावरून रामदेव बाबांची राजकीय भूमिका घेण्याचं सोडून केवळे व्यवसायावर लक्ष देण्याचं दिसत आहे. राजकारण्यांशी ना वैर ना मित्रत्व असा फॉर्मुला त्यांना अवलंबवल्याचं दिसत आहे.
 
रामदेव बाबांशी याच विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या पतंजली योगपीठात आम्ही पोहोचलो. पहाटेचा योगासनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून रामदेव बाबांनी लोकांना भेटायला सुरुवात केली.
 
2 तास वाट पाहिल्यानंतर आम्हाला रामदेव बाबांशी बोलण्याची संधी मिळाली. "तुम्ही तर राजकारणावर बोलायला आला असाल, पण मला सध्या या विषयावर काहीच बोलायचं नाहीये," असं त्यांनी सांगितलं.
 
"तुम्ही यावेळी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा देणार देणार आहात का?" असं विचारलं असता, "आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलुया प्लीज," असं त्यांनी उत्तर दिलं.
 
त्यांचं एकदंरीत वागणं पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की असं काय घडलं ज्यामुळे 5 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी याचा खुलेपणाने प्रचार करणारे आता मूग गिळून गप्प आहेत?
 
भाजपला रामदेव बाबांची गरज राहिलेली नाहीये की रामदेव बाबाच भाजपपासून दूर चालले आहेत?
 
याविषयी ज्येष्ठ पत्रकार राकेश शर्मा सांगतात, "2014च्या लोकसभा निवडणुकीआधी रामदेव बाबांनी काळ्या पैशाविरोधात जोमाने प्रचार केला होता. मोदी परदेशातला काळा पैसा आणू शकतात असं सांगत त्यांनी त्यांच्या अनुयायांना भाजपला मत देण्याचं आवाहन केलं होतं. पण मोदी सरकारनं या मुद्द्यावर काही खास कामगिरी केलेली नाही. त्यामुळे रामदेव बाबांची त्यांच्या अनुयायांसमोर पंचाईत होऊ शकते."
 
ते पुढे म्हणतात, रामदेव बाबांची वैदिक शिक्षा बोर्डची मागणी मान्य करून त्यांची सरकारने मनधरणीही केली पण त्याने काही फरक पडल्याचं दिसत नाही.
 
हरिद्वारचे आणखी एक पत्रकार पीएस चौहान सांगतात, "यावेळी मोदींच्या बाजुनो बोलायला बाबांकडे ठोस नैतिक पार्श्वभूमी उरलेली नाहीये. काळ्या पैशावर काहीच कारवाई झालेली नाहीये. दुसऱ्या बाजुला त्यांना त्यांचा कारभारही सांभाळायचा आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता ते कोणाचीही बाजू घेत नाहीयेत."
 
नोटाबंदी आणि GST च्या निर्णयाचा पतंजलीच्याही व्यवसायावर परिणाम झाला आहे.
 
पतंजलीने 2018मधलं वार्षिक उत्पन्न जाहीर केलेली नाही. पण ते 2017च्या वार्षिक उत्पन्नाएवढंच असल्याचं सांगितलं आहे.
 
2017मध्ये पतंजली उद्योगाची उलाढाल 10,561 कोटी रुपये होती. ही उलाढाल याआधीच्या आर्थिक वर्षाच्या दुपटीहून जास्त होती. दरम्यान नोटाबंदी आणि GST चा कारभारवर परिणाम झाल्याचं बालकृष्ण यांनी सांगितलं होतं.
 
पतंजलीनं पायाभूत सुविधा आणि सप्लाय चेन यावर अधिक खर्च करत असल्यानं पतंजलीच्या उत्पन्नात घट झाल्याचं पंतजली कंपनीचे अध्यक्ष बालकृष्ण यांनी सांगितलं होतं.
 
नोटाबंदी आणि GSTवरून रामदेवबाबा नाराज आहेत का? असं विचारलं असता चौहान सांगतात, "मोदींच्या नोटाबंदी आणि GST या निर्णयांना रामदेव बाबांनी उघडपणे विरोध केला नसला तरी इतर उद्योगांसारखाचं पतंजलीच्या व्यवसायावर मोदी सरकारच्या निर्णयांचा परिणाम झाल्याचं आकड्यांवरून दिसतं. कंपनीचा विस्तार खुंटला आहे."
 
दरम्यान लाखो अनुयायी असल्याचा दावा करणाऱ्या रामदेव बाबांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपनं काही प्रयत्न केला नसावा का?
 
या प्रश्नावर बोलताना पत्रकार रतनमणी डोभाल सांगतात, "यामागे पंतजलीची आर्थिक कारणं असू शकतात. स्थानिक पातळीवर बोलायचं झालं तर भाजप यावेळी रामदेव बाबांच्या दारी गेले नाहीत. भाजपचे इथले उमेदवार (रमेश पोखरियाल निशंक) हे एकदाही त्यांना भेटायला गेले नाहीत."

दिनेश उप्रेती