1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 5 मे 2022 (13:30 IST)

शिर्डीतील साई मंदिरावरील भोंगे पूर्ववत सुरू ठेवावेत, मुस्लीम समाजाची मागणी

राज्यात भोंग्यावरुन वाद सुरू असल्यामुळे आज सकाळी शिर्डी येथील श्री साईबाबांची काकड आरती लाऊडस्पीकरवर झाली नाही. यावर खेद व्यक्त करत मुस्लीम समाजाने मागणी केली आहे की मंदीरातले भोंगे पूर्ववत ठेवावेत. मशिदीवरील भोंगे काढण्याची तयारी दर्शवतानाच त्यांनी मंदिरावरील भोंगे राहू द्यावे असे निवेदन केले आहे.
 
सध्या राज्यात सुरू असलेल्या भोंग्यांच्या वादामुळे शिर्डी येथील साई मंदिरावरील भोंगे बंद करण्यात आले आहेत. ते पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी शिर्डीतील मुस्लीम समाजाने केली आहे. शिर्डीतील जामा मशिद ट्रस्ट आणि मुस्लीम समाजाने यासंदर्भात एक निवेदन अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.
 
या निवेदनातील आशयानुसार, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अजानसाठी मशिदीत कोणताही स्पीकर वापरण्यात आला नाही. पण गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिर्डी साईबाबा मंदिरातील रात्रीची आणि सकाळची आरती लाऊडस्पीकरशिवाय झाली, हे अतिशय वेदनादायक आहे."
 
साईबाबांच्या द्वारकामाई मशिदीवर गेल्या सव्वाशे वर्षांपासून हिंदू-मुस्लीम एकतेचं प्रतीक असलेला हिरवा आणि भगवा ध्वज एकत्रित लावला जातो.
 
रामनवमी उत्सवात रामजन्माच्या कार्यक्रमाबरोबरच संदलचीही मिरवणूक असते.
 
रोज सकाळी दहा वाजता हिंदू-मुस्लीम एकत्रितपणे साईसमाधीवर फुले वाहतात. येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याला या भोंगावादाने गालबोट लागणं योग्य नाही, असं या निवेदनात म्हटलं आहे.
 
शिर्डीत देश-विदेशातून भाविक येतात. मंदिरावर पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची रोजी रोजी अवलंबून आहे. या जागतिक कीर्तीच्या देवस्थानावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता, तो पूर्ववत सुरू ठेवावा. विशेष बाब म्हणून त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी मुस्लीम समाजाने या निवेदनामार्फत केली आहे.
शिर्डी
"शिर्डी साईबाबा मंदिर इमारतीवरील भोंगा पूर्वीप्रमाणेच लावलेला आहे. पण मंदिराबाहेर लोकांना काकड आरती ऐकता यावी, यासाठी लावलेले भोंगे मंदिर प्रशासनाने हटवले आहेत. पोलिसांनी हे भोंगे हटवण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली होती," असं शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
मुस्लीम बांधवांनी दिलेल्या निवेदनाबाबत बोलताना ते म्हणाले, "मुस्लीम समाजबांधवांनी हे भोंगे सुरू करावेत, अशा आशयाचं निवेदन दिल्याबाबत त्यांचे आभार. भोंग्यांची विशेष परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत."
 
मनसेच्या 'भोंगे बंद' वादामुळे हिंदूचेच अधिक नुकसान - सचिन सावंत
"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकरचा मुद्द्यावरून सुरू केलेले राजकारण हिंदूंचे नुकसान करणारे ठरत आहे," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी दिली आहे.
 
"मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या नादात हिंदूंच्या सण उत्सवातही आता भोंगे वापरावर मर्यादा येऊ शकतात. आता मुस्लीम समाजाने स्वतः पहाटेची अजान बंद केली आहे पण काकड आरतीही बंद झाली. या वादात मनसेमुळे हिंदूचेच अधिक नुकसान झाले असून त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीची काकड आरती बंद झाली, हे पाप कोणाचे?" असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.