1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (16:07 IST)

महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष टिकणार : शरद पवार

सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष टिकणार असा विश्वास व्यक्त केला असून करोना संकटात उत्तम काम केल्याची पावतीदेखील दिली आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
“मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता अधिक हातात गेली पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे आणि हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असं वाटलं पाहिजे,” असं शरद पवारांना सांगितलं.
 
“मी राज्याचा मुख्यमंत्री असताना ग्रामपंचायत, गावचे पोलीस पाटील यामध्येही ओबीसी आणि इतरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील एका गावात गेलो असता चहासाठी एका घरी गेलो होते. तिथे जुने काही कार्यकर्ते होते. त्यांनी मला साहेब हे काम काही चांगलं केलं नाही म्हटलं. आमच्या गावची पाटीलकी गेल्यावर कसं व्हायचं असं ते म्हणाले. यावर नुकसान काय असं विचारलं असता ते उत्तर देऊ शकले नाही. पुन्हा पाच ते सात वर्षांनी भेट झाली असता गाव आता पूर्वीपेक्षा आता एकत्रित आहे असं सांगितलं. याचं कारण पिढ्यानपिढ्या सत्ता आमच्या घरात ठेवली होती. सत्ता अधिक लोकांच्या हाती गेली हे लोकांना आवडलं असल्याचं त्यांनी सांगितलं,” अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.