शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (19:18 IST)

महाराष्ट्र बंद: राज्यभरात संमिश्र प्रतिसाद, कुठे काय घडलं?

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
 
कोल्हापूरमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी मोठी दुकानं बंद ठेवत या बंदला समर्थन दिले. तर किरकोळ दुकानं तसंच छोटे व्यापार मात्र सुरू असल्याचे पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवा सुविधेसह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होती.
कोकणामध्येही महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांनी काही ठिकाणी पाठिंबा दिला आहे, तर काही ठिकाणी लखीमपूर घटनेचा निषेध करून दुकाने सुरू ठेवली. कोकणामध्ये सार्वजनिक वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
 
नागपुरात महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं हा बंद यशस्वी व्हावा यासाठी बर्डी सारख्या बाजारपेठेच्या परिसरात निदर्शने केली.
अमरावती जिल्ह्यातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अपवाद वगळता व्यापारी संघटनेनी बंदला पाठिंबा जाहीर केला. व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा देत दुपारी एक नंतर मुख्य बाजारपेठा बंद केल्या. मात्र सणासुदीच्या काळात फुलांचा व्यवसाय करणारे तसेच किरकोळ दुकानदारांनी त्यांचा व्यवसाय सुरूच ठेवला.
 
महाराष्ट्र बंदचा बस सेवांवर फारसा परिणाम पडला नाही. मुख्य आगारातून बस सेवा सुरळीत होती. मात्र बंदचा हाकेमुळं आगारात नागरिकांची गर्दी कमी होती. 
 
विरोधकांची सरकारवर सडकून टीका
विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवर जोरदार टीका केली आहे.
 
विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, "आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. आज बंद करणारी तीच मंडळी ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. लखीमपूर घटनेबद्दल तिथलं सरकार दोषींवर कारवाई करत आहेत.
 
"मात्र राज्य सरकार त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने बंद करत आहे. प्रशासनची मदत घेऊन, वापर करून, दमदाटी करुन लोकांना बंद ठेवायला प्रवृत्त केले जात आहे. आत्ता कुठे दुकाने सुरू होत होती, छोट्या व्यावसायिकांची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली होती. मात्र पुन्हा या सरकारने दुकाने बंद केली आहे".
दरम्यान, महाराष्ट्र बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
 
काही ठिकाणी बसेसची तोडफोड करण्यात आहे. काही ठिकाणी रस्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी लखीमपूर खिरी घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
 
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं हा एक दिवसीय बंद पुकारला आहे.