बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (18:09 IST)

महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होणार - संजय राऊत

राज्यातल्या सत्ता स्थापनेचं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. येत्या 5-6 दिवसांमध्ये सर्व गोष्टी पूर्ण होतील असं स्पष्ट करत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सरकार स्थापन होईल, असं राऊत यांनी सांगितलंय.
 
"विघ्नं दूर झाली आहेत. उद्या दुपारपर्यंत गोष्टी स्पष्ट होतील. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल," असं राऊत म्हणाले आहेत.
 
राष्ट्रपती राजवटीमुळे काही तांत्रिक गोष्टी असतात. कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. राज्यपालांना बहुमताचा आकडा साक्षीपुराव्यानिशी द्यावा लागतो. दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असं राऊत यांनी सांगितलं.
 
शरद पवारांनी देशाच्या पंतप्रधानांना भेटणं यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. विविध मुद्यांवर देशभरातले नेते त्यांना भेटत असतात. राज्याच्या स्थितीबद्दल पंतप्रधानांना माहिती द्यावी. राज्यातली शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे, असं त्यांनी पवार-मोदी भेटीवर म्हटलंय.
 
"अजित पवारांशी माझी प्रदिर्घ चर्चा झाली. महाराष्ट्रात लोकप्रिय सरकार येऊ नये असं वाटतं त्यांच्याकडून बेबनावाच्या बातम्या पेरल्या जातात," असं त्यांनी अजित पवारांबाबत येत असलेल्या बातम्यांबाबत म्हटलं आहे.