मनसे उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहेत. पोलिसांनी साताऱ्यातून या व्यक्तीला ताब्यात घेतले. मोहन अंबादास शितोळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो एक जोगता असून भिक्षा मागून आपली गुजराण करतो.
काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांना हा धमकीचा फोन आला होता. जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करु नकोस, अशा भाषेत पाटील यांना धमकी देण्यात आली होती. यानंतर रुपाली पाटील यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. या घटनेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली होती. तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो, असे राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितले होते.
तेव्हापासून खडक पोलिसांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी रुपाली पाटील यांना आलेल्या मोबाईल क्रमांकाचा तपशील जमवण्यास सुरुवात केली. हा तपशील आल्यानंतर पोलिसांना शितोळे याच्या पहिल्या पत्नीचा शोध लागला. तिच्याकडून पोलिसांना मोहन शितोळेचे आणखी पाच-सहा मोबाईल क्रमांक मिळाले. यापैकी एका मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवरुन पोलिसांनी मोहन शितोळे याला कराडच्या ओगलेवाडी येथून ताब्यात घेतले.