1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (08:26 IST)

विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य

Mandatory RT-PCR test
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितींच्या दिनांक २२ जून, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत याबाबत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधान भवन, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत RT-PCR चाचणी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
 
दोन्हीही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये दिनांक ३ किंवा ४ जुलै, २०२१ या निर्धारित वैध कालावधीसाठीची RT-PCR चाचणी करून त्याचा अहवाल विधान भवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असेल. लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोविड-१९ संदर्भातील प्रतिपिंड (Antibodies) चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांनासुध्दा RT-PCR चाचणी करणे अनिवार्य राहिल. मागील अधिवेशनांप्रमाणे विधान भवन प्रवेशद्वाराजवळील मंडपात दिनांक ३ आणि ४ जुलै, २०२१ रोजी, सकाळी ९.०० ते सायं. ६.०० यावेळेत RT-PCR चाचणीची सुविधा सर्व संबंधितांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड-१९ संदर्भातील लसींचा पहिला अथवा दुसरा डोस घेतलेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असली तरी काही जण कोरोना विषाणूचे वाहक असू शकतात. त्यामुळे दोन्हीही डोस घेतलेल्यांना सुध्दा RT-PCR चाचणी इतरांच्या सुरक्षिततेसाठी करणे अत्यावश्यक असल्याचे मत या उच्चस्तरीय बैठकीत नोंदविण्यात आले.