आजारी पत्नीची हत्या करून वृद्ध पतीची आत्महत्या
दक्षिण सोलापूर तालु्क्यातील कुंभारी येथील गोदुताई विडी घरकूलमध्ये आजारी पत्नीची हत्या करून वृध्द पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अंबुबाई सुदर्शन पोटाबत्ती (वय 66) असे खून झालेल्या पत्नीचे तर सुदर्शन जोगय्या पोटाबत्ती (वय 72, दोघे रो. गोदुताई विडी घरकूल, कुंभारी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. सुदर्शन यांनी आरएपी डॉक्टर म्हणून काम केले होते. सध्या ते त्यांची पत्नी अंबुबाई हे दोघे गेल्या तीन महिन्यांपासून भाड्याने गोदुताई घरकूलमध्ये राहात होते. त्यांचा मुलगा श्रीनिवास हा बँकेत कामास असून तो व सून शहरात वास्तव्यास होते. अंबुबाई यांना गेल्या 15 वर्षांपासून मणक्याचा आजार होता. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते. त्यांची सुश्रुषा पती सुदर्शन हे करीत होते. गुरुवारी रात्री सुदर्शन व त्यांची पत्नी घरामध्ये झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास सुदर्शन यांनी फरशीच्या तुकड्याने पत्नी अंबुबाईच्या डोक्यात घाव घातले. त्यांनतर त्यांनी स्वतः नायलॉन दोरीने गळफास घेतला. घराला आतून कडी लावली असल्यामुळे हा प्रकार लवकर कोणाच्याही लक्षात आला नाही.