शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (08:20 IST)

मडगाव :रेल्वेतून येणाऱया मासळीवर नाही नियंत्रण तपासणी न होताच मासळीची विक्री

South Goa Planning and Development Authority (SGPDA)
गोव्यात सध्या मासेबंदी जारी आहे. या पार्श्वभूमीवर शेजारील राज्यांतून गोव्यात मासळी आयात केली जाते. पण, या मासळीची तपासणी केली जात नसल्याचे उघड झाले आहे. माशांची तपासणी केली जात नसल्याने फॉर्मेलिनची भीती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
 
दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (एसजीपीडीए) माशांची तपासणी करण्यासंदर्भात असहायता दर्शविली आहे. शेजारील राज्यांतून आयात केल्या जाणाऱया माशांची तपासणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय एसजीपीडीएने घेतला आहे. मडगावच्या घाऊक मासळी मार्केटच्या बाहेर काही घाऊक मासळी विक्रेते मासळी विक्री करतात. त्याची देखील तपासणी केली जात नसल्याचे अन्न व औषध प्रशासनने (एफडीए) स्पष्ट केले आहे.
 
मासळीची तपासणी होत नसल्याने संताप
मासेमारी बंदी लागू असल्याने शेजारील राज्यातून गोव्याच्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात माशांची आयात केली जाते. मात्र, या माशांची फॉर्मेलिनसाठी तपासणी केली जात नाही. या माशांची गुणवत्ता तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही. यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गोव्यात आयात केले जाणारे मासे फॉर्मेलिनमुक्त आहेत की नाही हे कळणे देखील कठीण होऊन बसले आहे.