गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (22:35 IST)

कोकण रेल्वे प्रश्नांसंदर्भात मुंबईत लवकरच बैठक!

konkan railway
चिपळूण-दादर पॅसेंजर रेल्वेसह विविध प्रश्नांसदर्भात लवकरच मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार असून त्या बैठकीला निमंत्रित करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांना दिले.
 
    केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे हे सोमवारी रत्नागिरी दौऱयावर आले असताना  त्यांची मुकादम यांच्यासह कळंबस्तेचे सरपंच विकास गमरे, माजी उपसरपंच विवेक महाडिक, बांधकाम व्यावसायिक आर.जी. कुलकर्णी व बशीर चिकटे यांनी भेट घेतली. यावेळी मागण्यांचे निवेदन सादर करतानाच यावर चर्चा करताना रखडलेल्या चिपळूण-कराड रेल्वेमार्ग प्रकल्पाला चालना देण्याची विनंती केली. तसेच कोकणातील प्रवाशाना रेल्वेतून प्रवास करताना कायम गर्दीचा सामना करावा लागत असल्याने चिपळूण-दादर पॅसेंजर सुरू करावी. त्याचा चिपळूण, खेड, माणगाव या तालुक्यांना फायदा होणार आहे. तसेच चिपळूण कळंबस्ते येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची आवश्यक आहे. या मार्गावरून अनेक रेल्वेच्या गाडय़ा धावत असतात. त्यामुळे या परिसरातील फाटक सारखे बंद करावे लागते. परिणामी या परिसरातील सुमारे पंचवीस गावांना त्याचा त्रास होत असल्याचे दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले.
 
   कोरोना कालावधीमध्ये अनेक स्थानकांमधील आरक्षण कोटा बंद करण्यात आला आहे. तो अद्याप चालू नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोकण रेल्वेमध्ये फक्त दोन पॅसेंजर गाडयांना जनरल तिकीट मिळते, बाकी सर्व गाडय़ांना आरक्षणाशिवाय तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. कोकण रेल्वेत भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतले. विद्यार्थ्यांकडून ठराविक रक्कम गोळा करण्यात आली. मात्र या भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त आणि कोकणातील मुलांना स्थान मिळाले नसल्याची तक्रारही मुकादम यांनी यावेळी मंत्र्यांकडे केली.