1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (15:58 IST)

कोकण रेल्वेचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण नाहीच

कोकण रेल्वेचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे मार्गाचे ज्या ठिकाणी दुहेरीकरण शक्य आहे त्याठिकाणी ते करण्यात आले आहे.  अजूनही काहीठिकाणी कामे सुरू आहेत. या रेल्वेचा मोठा भाग हा डोंगरदऱयातून जात असल्याने बोगदे व पुलांची संख्या मोठी आहे. त्याच्या दुहेरीकरणाबाबत चर्चा सुरु असल्याचे दानवे यांनी सांगितले.
 
रत्नागिरीतील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दानवे पाटील बोलत होते. कोकण रेल्वे मार्गावरील गणपती उत्सवासाठीच्या रेल्वे गाडय़ा फुल्ल झाल्या असल्याचे म्हटले जाते. पण कोकणातील चाकरमान्यांसाठी या मार्गावर जेवढय़ा गाडय़ा लागतील तेवढय़ा रेल्वे गाडय़ा दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
 
कोरोनाचे संकट गेली दोन वर्ष देशात होते. त्या कालावधीत सर्वच सुविधा बंद होत्या. आता सर्व सुरळीत होत आहे. रेल्वेही रुळावर येत आहे. बंद असलेले स्टॉपही पुढील कालावधीत सुरु होणार आहेत. यातच कोळसा संकट उद्भवल्याने कोळशावरील 372 गाडय़ा बंद होत्या. बाहेरुन येणारा कोळसा महाग असल्याने देशांतर्गत कोळसा उत्खनन वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हे संकट दूर होऊन लवकरच रेल्वे वेगाने धावेल असे त्यांनी सांगितले.