गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (20:31 IST)

मिलिंद नार्वेकर: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नार्वेकरांकडे संशयाने का पाहिलं जातंय?

milind narvekar
शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात सामिल होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.
 
या चर्चांना स्वत: मिलिंद नार्वेकर हे ट्विटरच्या माध्यमातून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मिलिंद नार्वेकरांकडे संशयाच्या नजरेने का पाहिलं जाऊ लागलं? त्याच्या 5 कारणांचा आढावा ...
 
1. बंडानंतर एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यात अपयशी
विधानपरिषदेच्या निवडणूकीनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत काही आमदार सुरतला रवाना झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते बंड करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालं.
 
त्यावेळी उद्धव ठाकरेंनी यांनी आमदार रविंद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यास सुरतला पाठवलं.
 
उध्दव ठाकरेंचा निरोप घेऊन हे दोन्ही नेते पोहचले. काहीवेळ चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे माघारी फिरणार असं वाटत असताना या बंडात अधिक आमदार दाखल होत गेले.
 
त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मनधरणीसाठी गेलेले रविंद्र फाटक हेच दोन दिवसांत शिंदे गटात सामिल झाले. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्याकडे संशयाने बघितलं जाऊ लागलं.
 
2. एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहचले
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष वाढत गेला. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेवरच एकनाथ शिंदेंनी दावा केला. विधीमंडळाच्या अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी '50 खोके' आणि 'गद्दार' अशा घोषणा दिल्या.
 
हा संघर्ष टोकाला असताना एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहचले.
 
त्यावेळी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मिलिंद नार्वेकर यांच्या घरी थांबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काहीवेळ विविध विषयांवर चर्चाही केली. पण ही भेट वयक्तीक संबंधातून घेतली असल्याचं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले.
 
3. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंपासून दूर होते?
प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरेंसोबत सावलीसारखे सोबत दिसणारे मिलिंद नार्वेकर काही दिवस ठाकरेंबरोबर सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत.
 
त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे ठाकरेंपासून दूर झाले आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या.
 
4. टेंभी नाक्याला रश्मी ठाकरेंसोबत जाणं टाळलं?
उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या आनंद दिघे यांनी पहिल्यांदा स्थापना केलेल्या टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणार होत्या. काही दिवस त्यांची विशेष तयारीही सुरू होती.
 
पण मिलिंद नार्वेकर यांनी टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे जाणार त्याच्या आदल्या दिवशी रात्री हजेरी लावली.
 
नार्वेकर यांनी रश्मी ठाकरेंसोबत जाण्यापेक्षा आदल्या दिवशी रात्री टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन का घेतलं? इतर शिवसैनिकांप्रमाणे ते ही रश्मी ठाकरेंसोबत येऊ शकले असते.
 
पण तो योगायोग होता की नार्वेकरांनी मुद्दाम रश्मी ठाकरेंसोबत टेंभी नाक्याला जाणं टाळलं? याबाबत दबक्या आवाजात बोललं जाऊ लागलं.
 
5. मिलिंद नार्वेकर लवकरच आमच्याकडे येणार...!
"बाळासाहेब ठाकरे यांच्या चितेला हात लावणारा चरणसिंग थापाही आमच्यासोबत आला. आता लवकरच मिलिंद नार्वेकरही आमच्यासोबत येणार" असं शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात म्हटलं.
 
या भाषणानंतर गुलाबराव पाटील यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता, त्यांनी" मिलिंद नार्वेकर हे आमच्या शिवसेनेत दाखल होणार याचा पुर्नउच्चार केला. त्याचबरोबर आगे आगे देखो होता है क्या..! "असंही त्यांनी म्हटलं.
 
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे नार्वेकर यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमागे नक्कीच काहीतरी सुरू असण्याला दुजोरा मिळाला.
 
मिलिंद नार्वेकरांची सारवासारव?
शिंदे गटात सामिल होण्याच्या चर्चांनंतर मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर ट्विट केला. त्याचबरोबर दसरा मेळाव्याची तयारी कुठपर्यंत आली या अनुषंगाने शिवाजी पार्कवर जाऊन पाहणी केल्याचे फोटो नार्वेकर यांनी ट्विट केले.
 
मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटमधून ही चर्चा थांबण्यासाठी सारवासारव केली आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
 
कोण आहेत मिलिंद नार्वेकर?
मिलिंद नार्वेकरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पीए (स्वीय सहाय्यक) म्हणून राजकारणात त्यांना ओळखलं जातं. मिलिंद नार्वेकर पहिल्यांना मातोश्रीवर पोहोचले ते 1992 मध्ये.
 
त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली मुंबईतून. मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरातून. शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून ते काम करायचे.
 
1992 च्या महापालिका निवडणुकीआधी त्यांचा वॉर्ड विभागला गेला. नवीन वॉर्डचं शाखाप्रमुख पद मिळेल या आशेने मिलिंद नार्वेकरांनी पहिल्यांदा मातोश्रीत प्रवेश केला.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि महानगरचे संपादक संजय सावंत यांनी मिलिंद नार्वेकरांचा शिवसेनेतील प्रवास जवळून पाहिलाय.
 
ते सांगतात, "मिलिंद नार्वेकरांच्या कामाची पद्धत पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं, फक्त शाखाप्रमुखच रहायचं का काही वेगळं काम करायचंय?" यावर मिलिंद नार्वेकर यांनी, "तुम्ही द्याल ती जबाबदारी घेईन. सांगाल ते काम करायला आवडेल असं उत्तर दिलं."
 
1997 साली उद्धव ठाकरे राजकारणात हळूहळू स्थिरस्थावर झाले. 2002 मध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशनात त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
त्यानंतर उद्धव ठाकरेंची वेळ देणं, नेते-कार्यकर्त्यांचे फोन घेणं, दौरे आखणं ही जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर असायची.
 
राजकारणात स्थिरस्थावर झाल्यानंतर, हळूहळू उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून मोठे होऊ लागले. त्याचवेळी मिलिंद नार्वेकरांचं शिवसेनेतील स्थान आणि वजन वाढत गेलं.
 
उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असल्याने मिलिंद नार्वेकरांचं शिवसेनेतलं प्रस्थ हळूहळू वाढत होतं.
 
बाळासाहेब ठाकरेंना मिलिंद नार्वेकर विशेष आवडत नसल्याची चर्चा त्यावेळी वारंवार ऐकू येत असे. ही चर्चा खरी होती?
 
संजय सावंत सांगतात, "सुरूवातीला बाळासाहेबांना मिलिंद नार्वेकर विशेष आवडत नव्हते, ही वस्तूस्थिती आहे. पण, उद्धव ठाकरेंनी पक्ष सांभाळल्यानंतर हा राग हळूहळू कमी झाला."
 
शिवसेना नेते नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, मातोश्रीत चार भिंतीआड नार्वेकर यांना आजही विरोध होतोय. तर, आदित्य ठाकरेंना ते फारसे आवडत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येते.

Published By - Priya Dixit