गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:49 IST)

दुकानांना मराठी पाट्याः राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला हा इशारा

राज्यातील दुकानांना मराठी पाट्या लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. याबाबत राज यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला चांगलाच टोला लगावला आहे. तसेच, या निर्णयाचे खरे श्रेय हे मनसे आणि मनसैनिकांना असल्याचेही म्हटले आहे.
 
राज यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरं तर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलने केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला. तेव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच.
 
राज पुढे लिहितात की, यानिमित्त महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, याची अंमलबजावणी नीट करा. यात आणखी एक भानगड सरकारने करुन ठेवली आहे ती म्हणजे, मराठी भाषेशिवाय इतर भाषेचेही नामफलक चालतील. याची काय गरज आहे. महाराष्ट्राची भाषा देवनागरी लिपीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार. आणि याची आठवण आम्हाला पुन्हा करायला लावू नका. महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन