बुधवार, 21 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मार्च 2020 (16:40 IST)

शॅडो कॅबिनेटकडून ठाकरे सरकारकडे पहिली मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शॅडो कॅबिनेट कामाला सुरुवात केली आहे. शॅडो कॅबिनेटकडून ठाकरे सरकारकडे पहिली मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसेने थेट पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाच पत्र लिहिलं आहे. मनसे सरचिटणीस आणि शॅडो कॅबिनेटमधील पर्यटन विभागाचे सदस्य हेमंत गडकरी यांनी आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाजवळ सर्वसामान्य पर्यटकांची निवास व्यवस्था अल्पदरात उपलब्ध करुन देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी, गोंदिया जिल्ह्यातील सीमेवर नागझिरा, याचप्रमाणे निसर्गाचं वरदान लाभलेल्या नवेगाव बांध, इटियाडोह आणि बोदलकसा प्रकल्प, हाजरा फॉल पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र महागड्या आणि अपुऱ्या निवास व्यवस्थेमुळे पर्यटकांचा हिरमोड होत असल्याचा दावा गडकरींनी केला आहे.
 
‘विदर्भातील अभयारण्यांमध्ये वाढत असलेली पर्यटक संख्या लक्षात घेता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवारा खोल्यांची संख्या वाढवावी. तसंच वाढती महागाई पाहता निवारा खोल्यांचे चढे दर कमी करावेत. जेणेकरुन सर्वसामान्य मध्यमवर्गीय पर्यटकांना त्याचा फायदा होईल.’ असं पत्रात लिहिलं आहे.