8 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार
हवामान शास्त्र विभागाने 8 जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
इकडे राज्याच्या हवामानात बदल नोंदवली जात आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून मुंबईकरांना घाम फुटत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेची लाट असून मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यासह विदर्भाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तरी आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात 9 आणि 10 जून रोजी उष्णतेची लाट राहील. तसेच मुंबईत येत्या दोन दिवस आकाश जरा ढगाळ राहील.
दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढेल. येत्या 24 तासांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस पडेल. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल.