1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (09:50 IST)

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची डेडलाईन सहा महिने पुढे गेली

mumbai nagpur samrudhi expressway
कोरोना व्हायरसमुळे हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग (मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग) ची डेडलाईन सहा महिने पुढे गेली आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१ ची पहिले उदिष्ट गाठता येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता नव्या डेडलाईननुसार हे काम १ मे २०२२ अखेरीस वाहतुकीसाठी खुला होईल. या प्रकल्पातील पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी दरम्यानचा ५२० किमी अंतराचा टप्पा हा १ मे २०२१ रोजी सुरू होईल. तर डिसेंबर २०२१ पर्यंत हा मार्ग भिवंडीपर्यंत पुर्ण करण्यात येईल.
 
एकुण ७१० किमी लांबीच्या महामार्गात कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम काही महिन्यांसाठी लांबणीवर पडले आहे.  कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर आता मजुर समृद्धी महामार्गाच्या विविध पॅकेजमध्ये परतले आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात एरव्ही १८ हजार इतका असणारा मजुरांचा आकडा घसरत तो १० हजारांपर्यंत खाली आला होता. पण सद्यस्थितीला समृद्धीच्या विविध पॅकेजेसमध्ये एकुण २० हजार कामगार कार्यरत आहेत असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत एकुण १५२ किलोमीटरचे काम पुर्ण झाले आहे. एकुण प्रकल्पाचे काम १५ पॅकेजमध्ये सुरू असून या प्रकल्पासाठी ५५ हजार ३३५ कोटी रूपये इतका प्रकल्पाचा खर्च आहे. तर ४० हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामांवर खर्च होणार आहे. महामार्गावर ८ बोगदे, व्हायाडक्ट्स, रेल्वेमार्गावरील पूल, नदीवरील पूल इत्यादी संरचनांचा समावेश असेल.