मुंबईत 24 ते 27 मे दरम्यान पाणीकपात
मुंबईत 24 ते 27 मे दरम्यान चार तासांसाठी पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. या काळात पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे 100 किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. 24 ते 27 मेदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हे काम चालणार आहे. याच वेळेत पाच टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे.
ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी विभागात ही पाणीकपात असणार आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 'एन' आणि 'एस' विभागातील पूर्वेकडील भाग, संपूर्ण टी, एम पूर्व आणि एम पश्चिम विभाग, एल विभागातील पूर्वेकडील भाग, बी, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण आणि ए विभागाच्या पाणीपुरवठय़ामध्ये पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर या विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी जपून वापरावे. पाणीकपातीपूर्वी एक दिवस आधी पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.