शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (17:36 IST)

नुपूर शर्मां विरोधात मुस्लीम समाज रस्त्यावर, दगडफेक, जाळपोळीला सुरुवात

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि भाजपचे दिल्लीतले नेते नवीन जिंदाल यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्याविरोधात महाराष्ट्रासह देशभरात मुस्लीम समाजानं मोर्चे काढले आहेत.
 
महाराष्ट्रातील नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, जालना, परभणी इत्यादी भागात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला आहे.
 
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्लीसह देशभरात इतर ठिकाणीही मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला. महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील यातील काही मोर्चांनं हिंसक वळणही लागल्याचं दिसून आलं.
 
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याचे पडसाद आता जगभरात उमटतायत. ईशनिंदा केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांचं भाजपमधून निलंबन झालं असलं तरी हा वाद आता पेटलाय.
पैगंबरांचा विवाह आणि इस्लाम धर्मातल्या काही मान्यतांबाबत हे वक्तव्य आहे.
 
टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून बोलताना शर्मा यांनी अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी हे उद्गार काढले होते. त्यांच्या विधानांची री भाजपचे दिल्लीतले नवीन जिंदाल यांनी ओढली आणि हा वाद वाढला.
 
जगभरातून भारतावर टीका
या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोदी सरकारवर जगभरातून टीका होतेय. कतार, कुवेत, इराण या देशांसह इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेनं यावर जोरदार आक्षेप घेतलाय.
 
या देशांनी 5 जूनला त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांना बोलावून घेतलं आणि आपला निषेध व्यक्त केलाय.
 
पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर कतारनं नाराजी व्यक्त केली होती, त्यावर दोह्यामधील भारतीय दूतावासाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
 
केवळ कतार आणि कुवेतच नाही तर नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननेही (OEC) आक्षेप घेतला आहे आणि भारतातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तिनं केलेल्या वादग्रस्त विधानावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
 
एकापाठोपाठ केलेल्या ट्वीट्समध्ये OECने म्हटलं की, भारतात मुस्लिमांविरोधात सुनियोजित पद्धतीने हिंसाचार वाढत आहे. त्यावर बंधनं लादली जात आहेत. OECने आपल्या ट्वीटमध्ये हिजाब बॅन आणि मुसलमानांच्या मालमत्तेच्या नुकसानासंबंधीच्या बातम्यांचाही उल्लेख केला.
 
OECने म्हटलं की, पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्यं करणाऱ्या आणि मुस्लिमांविरोधात हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जावी.
 
मात्र, हे मत भारत सरकारचं अधिकृत मत नसून देशातल्या असामाजिक तत्त्वांचं हे मत आहे. याचा भारत सरकार पुरस्कार करत नाही.
 
नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर भाजपची कारवाई
भारतीय जनता पक्षाने रविवारी, 5 जून रोजी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
 
भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. यावर भाजप सर्व धर्मांचा आदर करीत असून कोणत्याही धार्मिक महापुरुषाचा अपमान हा निषेधार्ह असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
 
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग म्हणाले की, त्यांचा पक्ष कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या कोणत्याही विचारसरणीच्या विरोधात आहे.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अरुण सिंह म्हणाले, "भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक धर्म उदयास आले. भारतीय जनता पक्ष प्रत्येक धर्माचा आदर करतो. भारतीय संविधानाने नागरिकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. सर्वांचा आदर आणि सन्मान करण्याचा अधिकारही दिला आहे."
 
नुपूर शर्मांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाचा थेट उल्लेख भाजपने केला नसला तरी वृत्तसंस्था पीटीआय आणि एएनआयने दिलेल्या बातमीनुसार पक्षाने नुपूर शर्मा यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं आहे. तर नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
नुपूर शर्मा कोण आहेत?
नुपूर शर्मा या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना निवडणूकीत यश मिळालं नाही. मोठ्या फरकानं त्यांचा पराभव झाला. नुपूर दिल्ली भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्याही आहेत.
 
नुपूर शर्मा या भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्य होत्या.
 
नुपूर शर्मा यांचा जन्म 23 एप्रिल 1985 रोजी झाला. दिल्लीच्या मथुरा रोड येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्या इकॉनॉमिक ऑनर्समध्ये पदवीधर आहे. 2010 मध्ये त्यांनी दिल्लीच्या लॉ फॅकल्टीमधून एलएलबी पदवी पूर्ण केली.
 
त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एलएलएम पूर्ण केलं. त्यांच्या कुटुंबाला राजकीय आणि व्यावसायिक पार्श्वभूमी आहे.
 
नुपूर शर्मा कॉलेजमध्ये असल्यापासून राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिकिटावर निवडणूक लढवून त्या DUSU (दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ) च्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर त्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सक्रिय झाल्या.
 
त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधून केली. त्यांनी आजवर विविध पदांवर काम केलं आहे.